नागपूर : मोठा भाऊ रागावला म्हणून कोणालाही न सांगता घरातून निघून जाणे हा पर्याय आहे का. उलट तू गुन्हेगारांच्या हाती सापडशील. बाहेरचे जग खूप विचित्र आहे. लोक तुझा गैर फायदा घेतील. वाईट संगतीला लावतील. असे करू नको. अभ्यास करशील तर जीवनात पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही… घरातून पळालेल्या एका तरुणाला जवळ घेत हा वडिलधारा सल्ला दिला तो खुद्द नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी.

तक्रार अर्ज निवारण दिनाच्या निमित्ताने पोलीस आयुक्तांनी यांनी शनिवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. पोलीस आयुक्त ठाण्यात आल्याचे कळताच एक महाविद्यालयीन तरुण वेदांत शनिवारे हा आपल्या लहान भावाला घेऊन त्यांच्या समक्ष उभा ठाकला.

हुडकेश्वर परिसरातील आकाश नगरमध्ये शनिवारे कुटुंब आपला तरुण मुलगा घरून निघून गेल्याची तक्रार घेऊन आले होते. घरातून कोणालाही न सांगता गेलेल्या या तरुणाचा मोठा भाऊ वेदांतने त्याला अभ्यासावरून दटावले होते. वेदांत हा पुण्यात संगणक शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तर त्याचा लहान भाऊ बारावीत (विज्ञान शाखा) शिकत आहे. तो सध्या जेईईचीही तयारी करत होता.

वेदांतला शुक्रवारी आपला भाऊ क्लासला गेला नसल्याचे कळाले. त्यामुळे वेदांतने लहान भावाला दरडावले. अभ्यासावर लक्ष द्यायचे सोडून तू शहाणा बनतो आहेस का असे त्याने मोठ्या आवाजात दटावल्याने महाविद्यालयीन तरुणाने घर सोडले. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नसल्याने शनिवारे कुटुंब ठाण्यात पोचले. पोलीसांनी लगेच शोध पथकाला अलर्ट देत या तरुणाला शोधून काढले. त्याला सुखरूप कुटुंबाच्या हवाली केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त ठाण्यात आल्याचे कळताच वेदांत ठाण्यात पोचला. त्याने पोलीस आयुक्तांकडे लगेच लहान भावाशी एकदा बोलण्याची विनंती केली. सिंगल यांनी लगेच त्याला होकार देत त्याच्या लहान भावाला प्रेमाने मिठीत घेतले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत सिंगल यांनी आपुलकीने त्याला बोलते केले. त्याने प्रामाणिकपणे आपले अभ्यासात लक्ष नसून काल सकाळी तणावाखाली घर सोडल्याचे कबूल केले. त्यावर मुलाला समजावत सिंगल म्हणाले, बाहेरच्या जगात वाईट संगतीचा धोका असतो. गुन्हेगारीत पाय घसरण्याची शक्यता असते. घर हेच आपलं खरे संरक्षण आहे. घर सोडणे हा पर्याय नसतो बेटा अशी समजूत काढत पोलीस आयुक्त सिंगल यांनी त्याला पुन्हा असे न करण्याचा आपुलकीचा सल्लाही दिला.