नागपूर : उपराजधानीसह राज्यभरातील ग्राहकांचा स्मार्ट प्रीपेड मीटरला कडाडून विरोध आहे. त्यामुळे महावितरणकडून टीओडी (टाईम ऑफ डे मीटरिंग)च्या नावाखाली हे मीटर ग्राहकांकडे जबरदस्तीने लावले जात आहे. या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात गुरूवारी (१ ऑगस्टला) संध्याकाळी ६ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून मशाल मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनाबाबत आपण जाणून घेऊ या.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर म्हणाले, स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला वीज ग्राहकांसोबतच विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सतत्याने विरोध आहे. त्यानंतरही नागपूर शहर सह संपूर्ण विदर्भात टीओडी मीटर च्या नावाखाली गुपचूप पणे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम महावितरणद्वारे सुरू आहे. हे मीटर लावण्याचा परक्रम फक्त उद्योगपतींना फायदा पोहचवण्यासाठी आहे. यात वीज ग्राहकाची पिळवणूक होणार आहे. नागपूरसह राज्यात हे प्रीपेड वीज मीटर लागले तेथे वीज ग्राहकांना सामान्य पेक्षा ४ ते ५ पटीने जास्त वीज देयक येत आहे. त्यामुळे वीज देयकातून होणाऱ्या लुटीमुळे ग्राहक संतापले आहे.
मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानुसार स्मार्ट प्रीपेड मीटर वीजग्राहकांनी लावल्यास त्यांना दिवसाला प्रति युनिट ८५ पैसे बील कमी येणार. परंतु ही फक्त फसवी घोषणाच आहे. तसेच वीज दरवाढ २३ टक्यांनी कमी करणार असल्याचेही आश्वसन पुढील पाच वर्षात होणार आहे.
त्यामुळे आजपर्यंत झालेली अवास्तव वीज दरवाढ सरसकट व तात्काळ कमी करण्यात यावी तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेच लाऊ नये, याविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर शहरा तर्फे १ ऑगस्ट २०२५ ला, मध्य नागपुरातील गोळीबार चौक, नागपूर येथून सायंकाळी ६ वाजता ‘मशाल मोर्चा’ काढण्यात येणार व हा मशाल मोर्चाचे समरोप गांधीबाग उद्यान परिसरात केला जाईल, असेही मासूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले. या ‘मशाल मोर्चा’ला विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
नागपूर शहरातील वीज ग्राहकांचाही मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग असणार असल्याचा दावाही आयोजकांकडून केला गेला. आंदोलनात नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर शहर महिला अध्यक्षा ज्योतीताई खांडेकर, नागपूर शहर राजेंद्र सतई, नागपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष गिरीश तितरमारे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवींद्र भामोडे, गणेश शर्मा, अनिल केशरवानी उपस्थित राहणार आहे.