नागपूर : ‘कौन बनेगा करोडपतीच्या (केबीसी) हॉटसीटवर विराजमान ‘कौन बनेगा करोडपती’च्या ज्युनिअर वीकमध्ये २५ लाख जिंकणाऱ्या नागपूरकर स्पृहा तुषार शिनखेडे ही सध्या चर्चेत आहे. कौन बनेगा करोडपतीमुळे नागपूरची ही वंडर गर्ल आज संपूर्ण देशभरात चर्चेचे केंद्र ठरत आहे.
एकीकडे अतिआत्मविश्वासाने उत्तरे देणारा स्पर्धक सोशल मीडियावर ट्रोल होत असताना दुसरीकडे ज्या समंजसपणे, शांतचित्ताने उत्तरे देणारी स्पृहा सर्वांना आपल्या घरातील वाटू लागली आहे. इतक्या कमी वयात अध्यात्म आणि भारतीय ज्ञान परंपरेकडे असलेला तिचा ओढा पाहून महानायक अमिताभ बच्चनदेखील थक्क झाले.
स्पृहा तुषार शिनखेडे ही गिट्टीखदान परिसरात राहते. ती रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. इयत्ता सातवीमध्ये असलेल्या स्पृहाचा भगवद्गीता तसेच संस्कृत श्लोकांचा तगडा अभ्यास आहे. तिचे वडील तुषार खासगी कंपनीत नोकरीला असून आई सपना या गृहिणी आहेत. या खेळादरम्यान तिने स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात म्हटलेल्या तीन संस्कृत श्लोकांनी अनेकांना अवाक केले.
याबाबत अधिक सांगताना ती म्हणाली, ‘मला शालेय अभ्यासक्रमात संस्कृत विषय नाही. मात्र, घरातील वातावरण सुरुवातीपासून अध्यात्मिक स्वरूपाचे राहिले आहे. त्यामुळे स्वाभाविकच भगवद्गीता तसेच इतर धार्मिक बाबींकडे मन आकृष्ट झाले. तसेच चिन्मय मिशनच्या गीता वाचन स्पर्धेमुळे भगवद्गीता वाचू लागले.
शोदरम्यान बच्चन सरांच्या विनंतीवरून सकाळी उठल्यानंतर म्हटल्या जाणारा ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम्॥’ हा श्लोक सादर केला. त्यानंतर जेवणापूर्वीचा ‘अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्’ आणि झोपण्यापूर्वीचा ‘वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्’असे तीन श्लोक तिने म्हटले.
विनम्र स्वभावामुळे मदत
अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटणार हा विचार मनात आला तेव्हा प्रचंड भीतीने हात कापत होते. पण, सेटवर त्यांची एंट्री होताच काही सेकंदात संपूर्ण भीती पळाली. त्यांच्या विनम्र आणि सकारात्मक स्वभावामुळे सर्व विद्यार्थ्यांना ते आपलेसे वाटायला लागले. एका महानायकासोबत आपण बसतोय, याचा मनोमन अभिमानदेखील वाटत होता, असे स्पृहा शिनखेडे म्हणाली.
तिच्या या प्रवासामध्ये सोमलवार हायस्कूलच्या शिक्षिका श्वेता पवनीकर तसेच इतरांचा संपूर्ण पाठिंबा लाभला. केबीसीसाठी मी ‘मायथॉलॉजी’ श्रेणी निवडली होती. त्याबाबतची बरीच माहिती शाळेतील शिक्षकांनी पुरविली. शाळा आणि कुटुंबीयांच्या मदतीने हा पल्ला गाठता आला, असे ती म्हणते. जन्मत: नागपूरकर असल्याचा अभिमान तिच्या बोलण्यात झळकतो. मला आधी भटकंती आवडायची, आता नागपुरखेरीज कुठे जाण्यात मन लागत नाही, असे ती म्हणाली.