नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चाैधरी यांच्या वादग्रस्त कारकिर्दीबाबत चौकशी समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या खुलाशानंतर कुलगुरूंवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे राज्यपाल कार्यालयाकडून कळाले, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरू डॉ. चौधरींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे नागपूर विद्यापीठाचा तात्पुरता प्रभार दिला जाणार असल्याचीही माहिती आहे.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामाबाबत चौकशी करण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सखोल चौकशी केली असून यामध्ये कुलगुरू दोषी असल्याचे दिसून आले. मात्र, राज्य सरकार कुलगुरूंवर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे हा संपूर्ण अहवाल आणि त्याच्या शिफारशी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – यवतमाळ : बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, हत्या की आत्महत्या? चर्चांना उधाण

हेही वाचा – गोंदिया : कार अपघाताने अवैध मद्य वाहतुकीचे बिंग फुटले; दारूसह ९४,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; आमगाव पोलिसांचा निष्काळजीपणा उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाला विचारणा करण्यात आली असून त्यांनीही यासंदर्भात कारवाई सुरू केली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात दिली होती. त्यामुळे कुलगुरू आणि त्यांच्या प्रशासनातील जे दोषी असतील सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. राज्यपाल कार्यालयाकडून आता कारवाई सुरू करण्यात आली असून सध्या कुलगुरू चौधरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.