नागपूर : उपराजधानीत सध्या व्हायरल आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. घरोघरी सगळ्याच वयोगटातील व्यक्ती ताप, सर्दी, खोकला व अंगदुखीने त्रस्त आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण वृद्ध, लहान मुले आहेत. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थी आजारी पडत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. हवामानातील बदल आणि दिवस-रात्रीतील तापमानातील फरकामुळे संसर्गजन्य आजार पसरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात बालरुग्णांची गर्दी वाढली आहे. साधारणतः ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुले जास्त प्रमाणात बाधित होत आहेत. तीव्र ताप, नाक बंद होणे, सतत शिंका येणे, खोकला, थकवा, अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. मेडिकल, मेयो, डागा या शासकीय रुग्णालयांत रोज सहसा ३०० ते ४०० मुले उपचाराला येत होती. ही संख्या आता तिप्पट होऊन १ हजार ते १ हजार ५०० पर्यंत गेली आहे.
सध्या काही शाळेत प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत तर काहींच्या सुरू होणार असताना मुले आजारी पडत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मेडिकल, मेयो, डागातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, हा हंगामी व्हायरल आजार आहे. घाबरण्याचे कारण नाही, पण दुर्लक्ष केल्यास न्यूमोनिया किंवा दमा यासारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. वेळेवर तपासणी व योग्य औषधोपचार आवश्यक आहे. मुलांना भरपूर द्रवपदार्थ द्यावेत, जड आहार टाळावा व शाळेत पाठवताना मास्कचा वापर करावा, असे डॉक्टरांनी सुचवले आहे.
शाळांनी लक्ष न दिल्यास आजार वाढेल
आजारी विद्यार्थी शाळेत आल्यास त्यांच्यापासून इतरांमध्ये संक्रमण वाढते. त्यामुळे शाळांनीही पालकांना संक्रमित मुलांना सोबत न आणण्याच्या सूचना देण्याची गरज आहे. अन्यथा, संक्रमण आणखी वाढण्याची भीती आहे.
नागपुरातील बालरोग तज्ज्ञांचे म्हणने काय ?
“सध्या व्हायरल आजाराचे संक्रमण वाढल्याने शासकीय व खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लक्षणे असल्यास मुलांना मुखपट्टी घालावी. गर्दीत मिसळू देऊ नये. आजार पसरू नये म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. वेळीच शासकीय वा खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार केल्यास मुले लवकर बरी होतात, अशी माहिती लोकसत्ताशी बोलतांना मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक व सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.