अमरावती : लोकसभा निवडणुकीतील अमरावतीच्‍या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथून भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा रिंगणात आहेत, काँग्रेसने आमदार बळवंत वानखडे यांना तर प्रहार जनशक्‍ती पक्षाने दिनेश बुब यांना नवनीत राणांच्‍या विरोधात उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. नवनीत राणा यांच्‍या संपत्‍तीत गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये ४१.८७ टक्‍क्‍यांची वाढ झाल्‍याचे दिसून आले आहे.

उमेदवारी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञापत्रात त्‍यांच्‍या संपत्‍तीचे विवरण देण्‍यात आले आहे. २०१९ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्‍थावर मालमत्‍ता मिळून एकूण संपत्‍ती ही ११ कोटी २० लाख ५४ हजार ७०३ रुपये इतकी होती. आता ती १५ कोटी ८९ लाख ७७ हजार ४९१ रुपये असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. याचाच अर्थ त्‍यांच्‍या संपत्‍तीत ४.६९ कोटींची म्‍हणजे ४१ टक्‍के वाढ झाली आहे. विशेष म्‍हणजे, नवनीत राणा या त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांच्‍यापेक्षा श्रीमंत आहेत.

हेही वाचा…“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…

रवी राणा यांच्‍याकडे जंगम आणि स्‍थावर मिळून ७ कोटी ४८ लाख ६८ हजार ९८३ रुपये इतकी संपत्‍ती आहे. २०१९ मध्‍ये त्‍यांच्‍याकडे १ कोटी ५१ लाख ६३ हजार ७२३ रुपये इतकी संपत्‍ती होती. रवी राणांच्‍या एकूण संपत्‍तीत ७९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

नवनीत राणा यांच्‍याकडे २०.७४ लाख रुपये किमतीची टोयॅटो फॉर्च्‍युनर आणि ४.५० लाख रुपये किमतीची फॉर्च्‍युनर कार अशी दोन वाहने आहेत. रवी राणांकडे १४.५३ लाखांची स्‍कॉर्पिओ क्‍लासिक आणि ४०.२४ लाखांची एमजी ग्‍लॅस्‍टोर कार ही वाहने आहेत. नवनीत राणांकडे ५५.३७ लाख रुपयांचे सोन्‍या-चांदीचे दागिने आहेत.

हेही वाचा…चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत नवमतदार, महिला मतदारांची भूमिका निर्णायक

नवनीत राणा यांचे कर्जासह एकूण दायित्‍व ७.२७ कोटी रुपये, तर रवी राणा यांचे दायित्‍व हे ३.०२ कोटी रुपये आहे. नवनीत राणांकडे ५.३२ कोटींची जंगम आणि १०.५७ कोटींची स्‍थावर मालमत्‍ता आहे. रवी राणांकडे ३.५९ कोटींची जंगम आणि ३.८८ कोटींची स्‍थावर मालमत्‍ता आहे. पाच वर्षांमध्‍ये नवनीत राणांच्‍या संपत्‍तीत ४.६९ कोटींची तर रवी राणांच्‍या संपत्‍तीत ५.९७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. नवनीत राणा यांनी मुंबईतील कार्तिका हायस्‍कूलमधून इयत्‍ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून पुढील शिक्षण पंजाब येथे घेतल्‍याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे, पण त्‍याचा तपशील मात्र दिलेला नाही.