अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरून मुंबईत पोहचलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत परतणार आहेत. येत्या २८ मे रोजी त्यांचं अमरावती शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

हनुमान चालिसा प्रकरणात राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील वादाने टोक गाठले होते. राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्याने शिवसैनिकही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राणा दाम्पत्याला २२ एप्रिल रोजी पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या खार येथील निवासस्थानावरून अटक केली होती. त्यानंतर त्यांना तुरूंगातही जावे लागले. तुरूंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रवी राणा यांच्या समवेत नवी दिल्लीत पोहचल्या.

दिल्लीतील मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करून त्यांनी राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. काही दिवसांपुर्वी त्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त लद्दाख येथे गेल्या होत्या. या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार रवी राणा यांचे एकत्र भोजन करतानाची छायाचित्रे सार्वत्रिक झाली आणि त्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात रंगली.

महिनाभराहून अधिक काळ राणा दाम्पत्य अमरावतीपासून दूरच आहेत. आता त्यांच्या परतीचा दौरा ठरला आहे. राणा दाम्पत्याचे येत्या २८ मे रोजी नागपूर विमानतळावर दुपारी १२.४५ वाजता आगमन होणार आहे. येथे त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जाणार असून नागपुरातील राम मंदिरात हनुमान चालिसा पठण, आरती आणि महापूजेच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. यानंतर दोघेही अमरावतीकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा : पालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण

अमरावती जिल्ह्यात तिवसा, मोझरी, नांदगाव पेठ आणि मार्गावरील इतर ठिकाणी त्यांचे स्वागत केले जाणार आहे, तर सायंकाळी अमरावतीत आगमन झाल्यावर चौका-चौकात त्यांच्या स्वागताची तयारी राणा समर्थकांनी केली आहे.