गडचिरोली : गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार, अशी घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी कारवाया सुरु आहेत. मात्र, ही चळवळ संपणार नाही, असा दावा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने पत्रकातून केला आहे. यात त्यांनी वर्षभरात नक्षलवादी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य करून तब्बल ३५७ नक्षलवादी ठार झाल्याची कबुली दिली आहे. या संदर्भात नक्षलवाद्यांनी २२ पानांचे एक पत्रक जारी केले असून मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ सप्ताह घेण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद समाप्त करू, अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात आक्रमकपणे मोहिमा सुरु आहेत. दरम्यान, जवानांसोबतच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सप्ताह घेत असतात. यावर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान हा सप्ताह होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. सैन्य दलाने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार हल्ले केले. त्यामुळे ३५७ नक्षलवादी ठार झाले. यात १३६ महिलांचा समावेश आहे.

सैन्य दलाचे हल्ले उधळून लावण्यासाठी या गनिमी काव्यानुसार युध्दनीती बदलावी लागेल, असे देखील त्यात नमूद केले आहे. नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता व भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)सरचिटणीस बसवराज (बीआर) आणि केंद्रीय समितीचे आणखी तीन सदस्य, राज्य समितीचे १५ सदस्य आणि इतरांना गमावले आहे. चार जण पक्षाचे सरचिटणीस, १६ राज्य समिती दर्जाचे, २३ जिल्हा समिती, ८३ एसी/पीपीसी, १३८ सदस्य, १७ पीएलजीए सदस्य, ३४ जण केंद्रीय समितीसदस्य आहेत. ३६ लोकांची माहिती उपलब्ध नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

पहिल्यांदाच चळवळीचे मोठे नुकसान

वर्षभरात चकमकीत ठार झालेल्या प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या चळवळीतील प्रवासाची तपशीलवार माहिती देखील पत्रकात दिली आहे. नक्षलबारीनंतर पहिल्यांदाच एका वर्षाच्या कालावधीत ४ सीसीएम आणि १६ एससीएम शहीद झाले. या नुकसानाचा क्रांतिकारी चळवळीवर तुलनेने दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होईल,असेही पत्रकात नमूद आहे.

केंद्र आणि राज्य सशस्त्र दलांकडून सरासरी १५-२० दिवसांतून एकदा हल्ला होतो. या हल्ल्यांमध्ये पक्षाचे १०-३५ सहकारी, पीएलजीए, स्थानिक संस्था आणि लोक मारले जात आहेत. सर्व मृत नक्षल १६-१७ ते ९६ वयोगटातील आहेत. सदस्यांपासून ते सर्वोच्च पातळीवरील नेत्यांपर्यंतच्या नक्षलवाद्यांचा यात समावेश आहे. मात्र, जवानांनाही जशास तसे उत्तर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात, वर्षभरात देशात ७५ सुरक्षाजवानांना ठार केले आणि १३० जण जखमी झाले. असा असा दावा पत्रकातून करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पत्रक पाहिले आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच अलर्ट आहे. माओवाद्यांच्या सप्ताहाला कुठेही थारा मिळणार नाही. सीमावर्ती भागात योग्य त्या सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक.