नागपूर – ओडिशातील ब्रह्मपूर (बेरहाम्पूर) ते गुजरातमधील उधना (सूरत) दरम्यान नवीन अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली असून, ही गाडी नागपूरमार्गे धावणार आहे. त्यामुळे आता ओडिशा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रमुख शहरांशी सुलभ आणि थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीचे अलीकडेच उद्घाटन झाले. ट्रेन क्रमांक १९०२१/१९०२२ असलेल्या या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर आठवड्याला एकदा प्रवासाची संधी मिळणार आहे. उधनाहून प्रत्येक रविवारी सकाळी ७.४० वाजता गाडी सुटेल, तर ब्रह्मपूरहून प्रत्येक सोमवारी रात्री ११.४५ वाजता प्रस्थान करेल. नागपूर स्थानकावर सकाळी ७ वाजता आगमन आणि ७.१५ वा. प्रस्थान असणार असून, १५ मिनिटांचा थांबा दिला जाणार आहे.
या गाडीला एकूण ३० थांबे असून यामध्ये पलासा, विशाखापट्टणम, श्रीकाकुलम, रायगड, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, व्यारा, बार्डोली आणि उधना या शहरांचा समावेश आहे.
वैशिष्ट्ये:
- २२ एलएचबी डबे – ८ स्लीपर, ११ जनरल सेकंड क्लास, १ पँट्री कार, २ लगेज व्हॅन
- कमाल वेग १३० किमी/तास – जलद आणि वेळेची बचत
- परवडणारे तिकीट दर – सामान्य कुटुंबांसाठी योग्य
- थेट आणि थकवाविरहित प्रवास – व्यापार, पर्यटन, आणि कुटुंब भेटीसाठी आदर्श
विदर्भाला जोडणारा दुवा
ही ट्रेन विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती या शहरांना थेट गुजरात आणि ओडिशाशी जोडते. परिणामी, येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि सामाजिक कारणांसाठी प्रवास अधिक सोपा, वेगवान आणि परवडणारा होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, ही अमृत भारत एक्स्प्रेस नागपूर मार्गे धावणारी दुसरी गाडी असून, येत्या काळात तिची सेवा आणि फेऱ्या वाढवण्याची शक्यता आहे.