वर्धा: काँग्रेसतर्फे ११ डिसेंबरला नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा नेण्यात येणार असून यात विदर्भातून एक लाखावर कार्यकर्ते सहभागी होणार आहे. हा मोर्चा सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा ठरेल, असा दावा कॉंग्रेसच्या जिल्हा निरिक्षक जिया पटेल व पक्षाच्या उद्योग शाखेचे राज्यप्रमुख अतुल कोटेचा यांनी केला.
मोर्चाच्या अनुषंगाने त्यांनी पत्रपरिषदेतून आज माहिती दिली. मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात व अन्य बडे नेते करतील. वर्धा जिल्ह्यातून पंधरा हजारावर लोकं सहभागी होणार असल्याचे व त्याची जबाबदारी कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर टाकण्यात आली आहे.
हेही वाचा… राज्यपाल आठवडाभर विदर्भात, काय आहेत कार्यक्रम?
सरसकट दुष्काळ जाहीर करावा, विनाअट विमा, प्रती एकर ५० हजार रूपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बेरोजगारीचा प्रश्न सुटावा व अन्य मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दीक्षाभूमी ते टी-पॉईंट दरम्यान हा मोर्चा चालेल. कॉग्रेस नेते शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, प्रमोद हिवाळे, सुरेश ठाकरे, इंद्रकुमार सराफ, इक्राम हुसेन यांनीही मते व्यक्त केली.