दहा दिवसांत तीन मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान

करोनानंतर येथील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठप्प पडल्या होत्या. परंतु करोनाचा प्रकोप कमी झाल्यावर पुन्हा शस्त्रक्रिया वाढत आहेत.

वृद्धाच्या अवयवदानातून बुधवारी तिघांना जीवदान

नागपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील एका ६२ वर्षीय वृद्धाने जगाचा निरोप घेताना केलेल्या अवयवदानातून न्यू ईरा रुग्णालयातील एका ४५ वर्षीय पुरुषाला यकृत प्रत्यारोपणातून तर इतर दोन खासगी रुग्णालयांतील रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. त्यातच नागपुरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून प्रथमच दहा दिवसांत नागपुरात तब्बल तीन मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदानाची नोंद झाली.

भीमराव रामदास गजभिये (६२) रा. चंद्रपूर असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. ते वेकोलितून निवृत्त झाले होते. २० ऑगस्टला घरातील स्वच्छतागृहात पडल्यावर त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचे मेंदूमृत झाल्याचे निदर्शनात आले. रुग्णालयातील चमूसह विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या डॉ. विभावरी दाणी, डॉ. संजय कोलते, विना वाठोडे यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. नातेवाईकांनी होकार दर्शवताच बुधवारी प्रतीक्षा यादीतील न्यू ईरा रुग्णालयात एका ४५ वर्षीय पुरुषाला यकृत, किंग्जवे रुग्णालयातील एका पुरुषाला मूत्रपिंड तर ऑरेंज सिटी रुग्णालयातील एका ४८ वर्षीय व्यक्तीला मूत्रपिंड ग्रिन कॅरिडोरद्वारे पोहचवून प्रत्यारोपित केले गेले. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया न्यू ईरा रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, यांच्यासह किंग्जवेचे डॉ. प्रकाश खेतान, ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉ. एस. जे. आचार्य यांच्या नेतृत्वात झाली. दरम्यान, यापूर्वी शहरात १६ ऑगस्टला एक तर १७ ऑगस्टला दुसऱ्या मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान केले गेले. करोनानंतर येथील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठप्प पडल्या होत्या. परंतु करोनाचा प्रकोप कमी झाल्यावर पुन्हा शस्त्रक्रिया वाढत आहेत.

सर्वाधिक यकृत प्रत्यारोपण न्यू ईरा रुग्णालयात

देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात मूत्रपिंड, यकृत, हृदय प्रत्यारोपणाचीही सोय आहे. आजपर्यंत येथील सर्वाधिक ४३ यकृत प्रत्यारोपण न्यू ईरा रुग्णालयात झाले आहेत.  येथे आजपर्यंत ३५ मूत्रपिंडांचेही प्रत्यारोपण झाले आहे. समाजाने पुढे येऊन मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतल्यास मोठ्या संख्येने विविध अवयवांची गरज असलेल्यांचे प्राण वाचणे शक्य आहे, असे मत हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांनी व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Organ donation from three brain dead patients in ten days akp

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या