नागपूर : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मे महिन्यात होणाऱ्या बदल्या यावर्षी जून महिन्यात झाल्या आहे. शुक्रवारी राज्याच्या गृहविभागाकडून अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.
या बदलीत नागपूर शहराला चार नवे पोलीस उपायुक्त मिळाले आहेत. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची बदली पिंपरी चिंचवड येथे झाली आहे. सोलापुरातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गोंदियाचे नित्यानंद झा, छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी आणि वर्धेचे अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांना नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली.
याशिवाय मुंबई मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील हे नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केद्राचे अधीक्षक, चंद्रपूर येथील अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांना राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांची मानवी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली. नागपूर येथील नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांची वर्धा येथे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे.