नागपूर: देशभरातील क्रिकेट सट्टेबाजांसाठी नागपूर शहर नंदनवन ठरत असून आयपीएल स्पर्धेच्यावेळी अनेक सट्टेबाज नागपुरात ठाण मांडून बसतात. क्रिकेट सट्टेबाजीत असलेली लाखोंची कमाई बघता नागपूर पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारीही आमिषाला बळी पडले. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांच्या माध्यमातून क्रिकेट सट्टेबाजी खेळण्यास सुरुवात केली. कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूरच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांनी सट्टेबाजी खेळल्याचे समोर येताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना थेट निलंबित केले. उमेश आचरेकर आणि सुभाष सार्वे अशी सट्टेबाजी खेळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

कुख्यात गुंड सुमित ठाकूर टोळीची दहशत शहरात वाढली होती. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांशी त्याने मैत्री केली होती. तसेच पोलिसांच्या कारवाईची माहिती पोहचविण्यासाठी तो वेगळी रक्कम काही पोलिसांना देत होता. त्यामुळे सुमित पोलिसांवर नेहमी वरचढ ठरत होता. सुमित ठाकूरने कमल नाईक नावाच्या युवकाचे अपहरण करून लुटमार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर सुमितवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने १२ गुन्हेगारांच्या घरावर छापे घालण्यात आले.

हेही वाचा… “राज्यात अर्धा डझन मराठा नेते मुख्यमंत्री झाले; ओबीसी नेत्यांना दोष देता येणार नाही,” वनमंत्री मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

त्यात सुमित ठाकूरचे साथिदार लाला पांडे आणि कम्मू ऊर्फ कमलेश यादव हे दोन्ही गुन्हेगार क्रिकेट सट्टेबाजीत सक्रीय आहेत. या दोघांकडे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी उमेश आचरेकर आणि सुभाष सार्वे या दोघांनी दीड ते दोन लाख रुपये क्रिकेट सट्टेबाजीवर गुंतवली होती. क्रिकेट सामना हरल्यामुळे दोघांचेही दीड-दीड लाख रुपये क्रिकेट सट्टेबाजांच्या घशात गेले होते. ही माहिती समोर येताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उमेश आचरेकर आणि सुभाष सार्वे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस विभागाची प्रतिमा मलीन

सध्या युवा पीढी क्रिकेट बेटींगच्या जाळ्यात अडकली असून पोलीस आयुक्त वेगवेगळे अभियार राबवून क्रिकेट सट्टेबाजांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई करणारे पोलीसच सट्टेबाजीच्या चक्रव्युहात अडकले आहेत. त्यामुळे नागपूर पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. क्रिकेट बुकी बोमा यानेही काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले आहेत तर गुन्हे शाखेच्या प्रत्येक युनिटमध्ये सट्टेबाजांनी एक कर्मचारी हाताशी धरला असल्याची माहिती आहे.