नागपूर: काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याकडून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली जाते. रविवारी संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात प्रियंका गांधी यांनी ‘रोड शो’ केला. यावेळी बडकस चौकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. प्रियंका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांना बघून टाळ्या वाजवल्या. झेंड दाखवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, महाराष्ट्रात यावेळी विजय महाविकास आघाडीचाच होणार अशा घोषणा दिल्या.

महालच्या गांधी गेट समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’ला सुरुवात झाली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  महाल, गांधी गेट चौक ते कोतवाली पोलीस ठाणे मार्गे बडकस चौकापर्यंत ‘रोड शो’ होता. बडकस चौकामध्ये मोठा हार घालून प्रियंका गांधी यांचे स्वागत करण्यात आले. बडकस चौकातील दोन्ही बाजूच्या इमारतीवर आणि रस्त्यावरही काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोळा होत प्रियंका गांधींना पक्षाचे झेंडे दाखवले. तसेच जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. प्रियंका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांनाही अभिवादन करत महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आव्हान केले.

हेही वाचा >>>प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..

काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’ संपल्यावरही बडकस चौकात हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपचे झेंडे दाखवत घोषणा दिल्या. यावर मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी तब्बल चार तासांपासून भाजपचे कार्यकर्ते थांबून होते, यासाठी आभार मानत टीका केली. तसेच तुम्हाला दोन रंग हवे आहेत की तिरंगा हवा? असा प्रश्नही केला. यामुळे परिसरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोड शोला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, फक्त प्रियंका गांधींना एकदा पाहण्यासाठी

प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’च्या मार्गातील रस्ते छोटे असतानाही प्रियंका गांधींना एकदा प्रत्यक्ष बघता यावे म्हणून नारिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. रस्त्यात उभे असलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी महिलांचा प्रतिसाद सर्वाधिक दिसून आला. प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात. पहिल्यांदाच त्या नागपूरला येत असल्याने प्रचंड आकर्षण असून त्यांना एकदा बघण्यासाठी आम्ही दुपारच्या दोन वाजतापासून थांबून आहोत अशा महिलांच्या प्रतिक्रिया होत्या.