नागपूर : महामेट्रोमध्ये पात्र नसलेल्यांना अधिकारी पदावर रूजू करवून घेण्यात आले असून सर्व निकष बाजूला ठेवून पदोन्नती देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) चौकशीची मागणी व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

महामेट्रोमध्ये नोकरी भरतीमध्ये मागासवर्गीय जातींचे आरक्षण डावलण्यात आल्याचे आधी स्पष्ट झाले होते. आता अपात्र उमेदवाराला नोकरी पदोन्नती देण्यात आल्याचा प्रताप समोर आला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीत पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, एम.पी. सिंग यांना व्यस्थापक (एचआर) या पदावर गैरकायदेशीर नियुक्ती देण्यात आली आहे. त्याविरुद्ध केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. एम.पी. सिंग (एम्लाई नं. ७४३००५०) हे मध्य रेल्वेत कल्याण निरीक्षक येथे कार्यरत होते. त्यावेळेस त्यांची वेतन श्रेणी ९३०० -३४,८०० रुपये अशी होती. त्यांना २०१६ मध्ये प्रतिनियुक्तीवर महामेट्रोत घेण्यात आले. रेल्वेमध्ये त्यांचा ग्रेड ७ होता. एम.पी. सिंग यांनी महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक दीक्षित यांना पत्र लिहिले. त्यानंतर त्यांची प्रतिनियुक्तीवर निवड झाली. २०१६ पासून ते सहायक व्यवस्थापक (एचआर) या पदावर कार्य करीत आहेत. त्यांना ग्रेड ७ पासून सरळ ग्रेड २ वर नियुक्ती देऊन त्यांची वेतन श्रेणी १०००० ते १५२००० प्रमाणे करण्यात आली.

हेही वाचा – फडणवीसांनंतर शिंदेंची भेट, ओबीसींच्या मुद्यावर तायवाडेंची मोर्चेबांधणी

हेही वाचा – विनानोंदणी प्रसाद वाटणाऱ्या धार्मिक स्थळांची माहितीच नाही, अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामेट्रोच्या धोरणानुसार इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना नोकरीमध्ये सामावून घेताना फक्त १ ग्रेडपर्यंत पदोन्नती देता येते. परंतु एम.पी. सिंग यांना ग्रेड ७ वरून थेट ग्रेड २ ची नियुक्ती देण्यात आली. व्यवस्थापक (एचआर) या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता एम.पी. सिंग यांच्याकडे नाही. व्यवस्थापक (एचआर) या पदासाठी एमबीए असणे अनिवार्य आहे. सिंग यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी आहे. याशिवाय एम.पी. सिंग यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या नातेवाईकांना मेट्रोत नोकरी दिली आहे. महामेट्रोतील भरती घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली. यावेळी सनदी लेखापाल विजयकुमार शिंदे, माजी नगरसेवक राजेश माटे उपस्थित होते.