नागपूर : मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे २०२२-२३ हे शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यानिमित्त विद्यार्थी आणि समाजासाठी कौशल्य, क्रीडा व आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सोयीसुविधा उभारण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी १०७ कोटींचा प्रस्ताव सादर केला.

नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षांला ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होणार आहे. यासाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली असून विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी कुलगुरूंनी विद्यार्थी आणि समाजोपयोगी योजना आखल्या आहे. याकरता राज्य शासनाने १०७ कोटींची मदत करावी, अशी मागणी कुलगुरूंनी केली आहे. अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनीही या प्रस्तावासाठी सरकारकडे जोर धरला असून पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.

असा आहे प्रस्ताव

  •   टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड एनर्जी पार्क -३१.५८ कोटी
  •   तांत्रिक कौशल्य विकास केंद्र – २६.९५ कोटी
  •    जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकूल- ३०.२७ कोटी
  • जनतेकरिता प्राचीन इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय- ४.२७ कोटी
  • गोंडी व इतर आदिवासी भाषा अध्यासन केंद्र व राजे बख्त बुलंदशाह केंद्र – १३ कोटी