लोकसत्ता टीम
नागपूर: उपराजधानीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटात लोखंडी पाईपने हाणामारी झाली. या प्रकरणात रॅगिंगची तक्रार केली असली तरी प्रथमदर्शनी हा प्रकार अंतर्गत वादातून घडल्याचे पुढे येत आहे. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणात १० विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात फेब्रुवारी २०२३ मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यासाठी विद्यार्थ्यांनी देणगी गोळा केली होती. त्यातील शिल्लक रकमेची एका बँकेत मुदत ठेवीत गुंतवणूक केली. ही रक्कम पुढच्या कार्यक्रमात वापरण्याचे नियोजन होते. दरम्यान, अद्यापही या कार्यक्रमातील खर्चाचा हिशोब सदर झाला नाही. त्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद सुरू आहे.
२२ जुलैला एका विद्यार्थ्याला दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याने वर्गातच मारहाण केली. त्यानंतर मारहाण झालेल्यांच्या मित्रांनी मारहाण करणाऱ्यावर थेट वसतिगृहात जाऊन हल्ला चढवला. यावेळी काहींकडे लोखंडी पाईप होते. या पाईपने मारहाण झाल्यावर चार जखमींपैकी तिघांवर मेडिकल तर एकावर आयुर्वेद महाविद्यालयातच प्राथमिक उपचार झाले. हाणामारीत एका कनिष्ठ विद्यार्थ्यालाही मार लागाला. त्याने दोन्ही गटातील मुलांचे नाव टाकत राष्ट्रीय रॅगिंग समितीकडे रॅगिंगची तक्रार दिली. त्यावर आयुर्वेद महाविद्यालयाकडून चौकशी केली असता प्रथमदर्शनी हा प्रकार वादातून झाल्याचे पुढे आले आहे. तसा प्राथमिक अहवालही महाविद्यालय प्रशासनाने संबंधित यंत्रणेला पाठवला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या दहा विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनाही तक्रार दिली आहे. पोलिसांकडून बुधवारी चौकशीला सुरुवात होणार आहे.
आणखी वाचा-नागपूरच्या रुंद रस्त्यांवरील ‘हे’ फिरते अडथळे पार करायचे कसे?
“प्रशासनाने १० विद्यार्थ्यांना वसतिगृहातून काढले आहे. पोलिसांकडेही तक्रार केली असून त्यातील चौकशीत दोषींवर कडक कारवाई केली जाईल. पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.” -प्रा. डॉ. सुभाष राऊत, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय.