मोर्शी-वरूड किंवा त्याआधी नांदगावपेठला जायचे असले तरी केवळ अकरा किलोमीटरच्या प्रवासासाठी पन्नास किलोमीटपर्यंतचा टोल द्यावा लागतो. या विरोधात अनेकांनी आवाज उठवला तरीही अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठ येथील टोल नाक्यावर प्रवाशांच्या नाकावर टिच्चून वसुली सुरूच आहे. आता नांदगावपेठ ग्रामपंचायतीने देखील टोल विरोधी भूमिका घेत टोल नाका स्‍थलांतरित करण्‍याबाबत ठराव मंजूर केला आहे.

हेही वाचा >>>वर्धा: नाद खुळा! युवा शेतकऱ्याने साकारले ‘फाईव्ह स्टार’ मचान

नांदगावपेठ येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील टोल नाका आहे. आयडियल रोड बिल्डर्सने हा रस्ता तयार केला आहे. त्याबदल्यात टोल आकारला जातो. मोर्शी-वरूडला जाण्यासाठी नांदगावपेठहून दुसरा मार्ग आहे, पण अमरावती ते नांदगावपेठ या अकरा किलोमीटर प्रवासासाठी संपूर्ण टोल नांदगावपेठ येथे भरावा लागतो. हा टोल नाका नागपूर मार्गावर नांदगावपेठहून थोडय़ा दूर अंतरावर न्यावा, अशी लोकांची रास्त मागणी होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

हेही वाचा >>>भंडारा: वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला; शासकीय वाहन जाळण्याचा प्रयत्न

गावाच्‍या आधी टोल नाका असल्‍याने नांदगावपेठ वासीयांना तर त्रास होताच, शिवाय यामुळे औद्योगिक विकास देखील खुंटला असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. ग्रामपंचायतीचा कर देखील थकित असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. ग्रामपंचायतीच्‍या मासिक सभेत टोल नाका हटविण्‍यात यावा, असा ठराव मांडण्‍यात आला, तो सर्वानुमते मंजूर करण्‍यात आला.

हेही वाचा >>>नागपूरकरांवर नवा करभार नाही; महापालिकेचा ३३३६.८४ कोटींचा अर्थसंकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ‌ दोन किलोमीटरचा रस्ता वापरण्यासाठी टोल का द्यावा, असा नांदगावपेठ, कठोरा, नांदुरा लष्करपुर, टाकळी जहागीर, बोरगाव धर्माळे आदी गावच्या नागरिकांचा जुनाच मुद्दा आहे. या मुद्द्यासाठी सर्व गावच्या नागरिकांचा समावेश असलेली टोलमुक्ती संघर्ष समिती फार पूर्वीपासून संघर्ष करत आहे. काही वर्षांपूर्वी या संघर्षाला यश आले आणि या गावच्या नागरिकांच्या वाहनांना विनाटोल प्रवास करता येईल, हे मान्य करण्यात आले. शिवाय ओळख पटावी, यासाठी संबंधितांना आयआरबी या टोल वसुल करणाऱ्या कंपनीतर्फे विशिष्ट ओळखपत्रेही देण्यात आली. परंतु नाक्यावरील बदललेल्या व्यवस्थापकाने गेल्या १ मार्चपासून त्यांची ही सवलत बंद केली. त्‍यामुळे टोलमुक्ती संघर्ष समिती विरुद्ध टोलनाका प्रशासन असा संघर्ष पुन्हा एकदा उभा ठाकला.