लोकसत्ता टीम

वर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात युद्धज्वर चांगलाच भडकला आहे. भाजपचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, डॉ. सचिन पावडे, शेखर शेंडे यांनी प्रचाराची राळ उडवून दिली असून आता आरोप व तक्रारी सूरू झाल्या आहेत.

काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी निवडणूक कार्यालयास तक्रार केली आहे. त्यात नमूद आहे की, आदर्श आचासंहिता लागू झाली आहे. सेलू व वर्धा तालुक्यात भाजप आमदार व्यक्तिगत बैठका घेत आहेत. त्यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट, जिवनोन्नती मिशन व अन्य सदस्यांस साडी व भांडी वाटप करीत आहेत. भोयर यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी. या तक्रारीची दखल घेण्याचे निर्देश निवडणूक नोडल अधिकारी यांनी वर्धा व सेलू तालुका महिला विकास अधिकारी व अभियान समन्वयक यांना दिलेत. विलंब न करता याचा अहवाल देण्याचीही सूचना आहे.

यावर आमदार भोयर यांच्या कार्यालयाने एक प्रसिद्धी पत्रक काढले.त्यात याचे खंडण केले. महिलांचा भाजप उमेदवारास भरघोस पाठिंबा मिळत असल्याने हेतूपुरस्सर आरोप व तक्रारी केल्या जात आहेत. महिलांनी असा कुठलाच प्रकार झाला नसल्याचे नमूद केले असून भेटवस्तू घेण्याचा प्रश्नच नाही, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

आणखी वाचा-सख्खा भाऊ झाला पक्का वैरी… अमोल देशमुख म्हणाले, आशीष देशमुखांची मानसिकताच….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेखर शेंडे यांनी आमदार भोयर यांची निवडणूक कार्यालयाकडे केलेली तक्रार चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे चांगलीच चर्चा झडत असल्याने या दोन तालुक्यातील संबंधित महिला गट आश्चर्य व्यक्त करीत आहे. या दोन तालुक्यात आशा सेविकांचे गट मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यात हजारो महिला वर्ग सेवारत असून बचत गट जाळे पण चांगलेच विस्तारले आहे. म्हणून काही महिलांनी याबाबत स्थानिक भाजप नेत्यांना विचारणा केली. तेव्हा आमदार कार्यालयाने यावर खुलासा केला आहे. सेलू ग्रामीण भागातील कमळ व पंजाचे कार्यकर्ते प्रचारात आक्रमक झाले आहे. डाव प्रतिडाव टाकण्याची एकही संधी सोडली जात नाही. आरोप प्रत्यरोप पण गाजू लागले आहे. यापूर्वी दोन्ही गटात राडा झालेला आहे. मात्र आता मानधन तत्वावर काम करणाऱ्या आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका तसेच बचत गट महिला यात ओढल्या गेल्याने प्रकरण गाजू लागले आहे.