नागपूर : दुकानात नोकरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर मालकाची वाईट नजर गेली. दुकानदाराने त्या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीयूष बंडुजी ढावले (३३, रा. सुठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित ३१ वर्षीय महिला आरोपीच्या दुकानात नोकरी करते. १२ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान आरोपीने या महिलेस जाळ्यात ओढले. तिला नोकरीवरून काढून टाकण्याची भाषा करीत तिला सतत भीतीच्या सावटाखाली ठेवले. त्यानंतर तिला धाक दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दीड वर्ष महिलेसोबत त्याने शरीरसंबंध केल्यावर महिलेने संबंध कायम ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु असताना तिने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने महिलेस मारहाण केली. दुकानातील नोकर महिलेशी लग्न करणार नाही, असे स्पष्टपणे सांगून नकार दिला. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

हेही वाचा…नागपूर : पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकारी म्हणतात, काहीच माहिती नाही

प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोखले यांनी हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता ‘मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही,’ असे उत्तर दिले. त्यामुळे प्रतापनगर पोलीस ठाण्यात अधिकारी कुठलीही माहिती न घेता गुन्हा दाखल करतात की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.