चंद्रपूर: राज्यातील विदर्भ भागात मार्च पासून तापमान वाढत जाते ते जुलै पर्यंत उन्हाचा मोठा प्रकोप असतो. त्यामुळे या भागातील उन्हाचा विचार करता उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन शासनाने २००७- ०८ पासून २२ जून २००७ ला आदेश काढत विदर्भातील शाळा २६ जून पासून सुरू करण्यात याव्यात. तसेच या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामाच्या दिवशी शाळा सुरू करण्यात याव्यात असा निर्णय दिला होता. हा निर्णय आजपर्यंत अंमलात येत आहे.

मात्र यावर्षी शाळा २३ जून पासून सुरू कराव्यात असा आदेश २९ एप्रिल रोजी येऊन धडकला आहे. त्यामुळे भर उन्हात मुलांना शाळेत जावे लागणार आहे. तेव्हा शाळा पूर्वीप्रमाणे २६ जूनपासून सुरू कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटनिस हरीश ससनकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव व शिक्षण संचालक यांना निवेदन देऊन केली.

सन २०२३ पर्यंत २६ जून पासून सुरू होणार सत्र सन २०२४ मध्ये उन्हाचा तडाखा आणखीन वाढल्यामुळे यामध्ये बदल करून शाळा १ जुलै पासून सुरू करण्यात आले. २०२५ मध्ये तर विदर्भात जगात रेकॉर्ड तापमान नोंद झालेली आहे विदर्भातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकोला, अमरावती या भागात तर ४५.८ अंशाच्या वर तापमान असते असे असतांना शाळा २३ जून पासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालक पुणे यांनी दिले.

वास्तविक सन २०२५ मध्ये मागील वर्षीप्रमाणे विदर्भातील तापमान जगात १ नंबर वर सातत्याने ३ दिवस होते व आजही सातत्याने भारतात १ नंबर वर तापमान राहत असताना देण्यात आलेले आदेश अनाकलनीय व अन्यायकारक आहे. शासकीय शाळांना असे बंधन टाकतांना याच आदेशात खाजगी शाळांना शाळा त्यांच्या मर्जीने सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ते आता कोणाचेही न ऐकता जून च्या सुरुवातीमध्येच भर उन्हात शाळा सुरू करणार आहेत यामुळे खाजगी शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची कोंडी नक्कीच होणार आहे. असे शाळांमध्ये भेदभाव करून कसे निर्णय घेतले जातात हा समाजसमोर पडलेला प्रश्न आहे.

करिता विद्यार्थी हिताचा विचार करून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात आनंददायी रीतीने व्हावी विद्यार्थ्यांना शाळेत येतांना उन्हाची झळ बसू नये यासाठी पुर्वीप्रमाने शाळा २६ जून पासून सकाळ सत्रात व १ जुलै पासून पूर्ण वेळेत सुरू करण्यात याव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे संघटनेचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्याध्यक्ष डॉ.अल्काताई ठाकरे, सचिव शारदाताई वाडकर, कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, कोषाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, प्रमुख संघटक भुपेश वाघ, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांनी केली आहे.