वर्धा : पुराच्या पाण्यात बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सहा चालकांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा… जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली ‘पल्याड’ची दखल; मराठी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार

निलंबित चालकांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. जोरदार पावसाने छोट्या-मोठ्या नाल्या, पुलांवरून पाणी वाहत आहे. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. अशी संकटमय स्थिती असूनही परिवहन मंडळाच्या काही चालकांनी पुरात बस चालविण्याचा धोका पत्करला. ते सुखरूप दुसऱ्या तिरावर पोहचले. प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, चालकांचे हे धाडस पाहून गावकऱ्यांनी आरडाओरड केली. त्याची तक्रार प्रशासनाकडे झाली.

हेही वाचा… नागपूर : कारागृहातील कैद्याकडे सापडला गांजा व भ्रमणध्वनीच्या १५ बॅटरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परिवहन मंडळ नियंत्रकाकडे विचारणा झाली. त्या नोटीसला सायंकाळी उशिरा नियंत्रकांनी उत्तर दिले. त्यावरून आर्वी आगारच्या पाच व तळेगाव आगाराच्या एका चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे याबाबत म्हणाल्या की, कारवाईचा अहवाल ११ वाजता प्रशासनाकडे सादर होणार आहे, तेव्हाच नावे कळतील. नियंत्रकांनी या संदर्भात बोलण्यास नकार देत कारवाई झाल्याची बाब मान्य केली.