नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी मध्यमवर्गीयांसाठी आधीच परवडणारी नव्हती. त्यानंतरही अनेक मध्यमवर्गीय पैशांची जुळवाजुळव करून कुटुंबीयांसह येत होते. मात्र, आता त्यांचे हे स्वप्नही धूसर झाले आहे. व्यवस्थापन कोट्याअंतर्गत सुधारित सफारी शुल्क एक ऑक्टोबरपासून लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ताडोबाची सफारी आता श्रीमंतांपुरतीच मर्यादित झाल्याचे चित्र आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून हे नवे शुल्क लागू होणार आहेत.

सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा पर्यटकांन खुणावत असतो. जागतिक जंगल पर्यटन नकाशावर भारतातील जी व्याघ्रपकल्प आहेत, त्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प एक आहे. देशातीच नाही तर परदेशातील पर्यटक देखील या व्याघ्रप्रकल्पाला भेट देतात. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींसाठी हा आवडता व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे ते देखील नियमित भेट देतात. कोअर क्षेत्रच नाही तर बफर क्षेत्रातही अलीकडे सहज व्याघ्रदर्शन होत आहे. किंबहूना कोअरपेक्षा बफरक्षेत्राकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

माया, मटकासूर, सोनम, मधू, छोटा मटका, छोटी मधू या वाघांमुळे पर्यटक या व्याघ्रप्रकल्पाकडे ओढले जातात. पावसाळी सुट्या संपण्यास आता आठच दिवस शिल्लक आहेत. येत्या एक ऑक्टोबरपासून ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटनाची दारे खुली होत आहेत. मात्र, त्याचवेळी पर्यटकांना नव्या सफारी शुल्कासह या व्याघ्रप्रकल्पात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

ताडोबा सफारीसाठी झालेली दरवाढ आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. गरजेनुसार सफारी शुल्क वाढवण्यात येतात. ताडोबाच्या संकेतस्थळावर देखील या वाढीव दराविषयीची नोंद करण्यात आली आहे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल म्हणाले.

जुने शुल्क काय होते…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात पूर्वी सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क चार हजार रुपये, मार्गदर्शक शुल्क सहाशे रुपये व वाहन शुल्क तीन हजार रुपये असे एकूण सात हजार ६०० रुपये शुल्क होते. शनिवार आणि रविवारी कोअर क्षेत्रात प्रवेश शुल्क आठ हजार रुपये, मार्गदर्शक शुल्क सहाशे रुपये, वाहन शुल्क तीन हजार रुपये असे एकूण ११ हजार ६०० रुपये आकारले जात होते.

बफर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क तीन हजार रुपये, मार्गदर्शक शुल्क सहाशे रुपये व वाहन शुल्क दोन हजार ७०० रुपये असे एकूण सहा हजार ३०० रुपये आकारले जात होते. शनिवार व रविवारी प्रवेश शुल्क सहा हजार रुपये, मार्गदर्शक शुल्क ६०० रुपये व वाहन शुल्क दोन हजार ७०० रुपये असे एकूण नऊ हजार ३०० रुपये आकारले जात होते.

सुधारित शुल्क काय आहे…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क चार हजार ६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क सातशे रुपये व वाहन शुल्क तीन हजार ३०० रुपये असे एकूण आठ हजार ६०० रुपये शुल्क आहेत. शनिवार आणि रविवारी कोअर क्षेत्रात प्रवेश शुल्क आठ हजार ६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क सातशे रुपये, वाहन शुल्क तीन हजार ३०० रुपये असे एकूण १२ हजार ६०० रुपये करण्यात आले आहेत.

बफर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क तीन हजार ६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क सातशे रुपये व वाहन शुल्क तीन हजार रुपये असे एकूण सात हजार ३०० रुपये आकारले जाणार आहेत. शनिवार व रविवारी प्रवेश शुल्क सहा हजार ६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क तीन हजार रुपये असे एकूण दहा हजार ३०० रुपये आकारले जाणार आहेत.