अमरावती: विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात तीन रेल्वे स्थानके असली, तरी रेल्वेसेवा अपुरीच असल्याचे चित्र आहे. बडनेरा रेल्‍वे स्‍थानकावरून जाणाऱ्या तब्‍बल दहा गाड्या बडनेरा रेल्वेस्थानकावर थांबत नाहीत. त्‍यातच आता पश्चिम रेल्‍वेने सुरत ते ब्रह्मपूरदरम्‍यान ८ नोव्‍हेंबरपासून विशेष रेल्‍वे चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे, ही रेल्‍वे देखील बडनेरा स्थानकावर थांबणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

०९०६९ क्रमांकाची सुरत-ब्रह्मपूर विशेष एक्‍स्‍प्रेस ८ नोव्‍हेंबर ते २७ डिसेंबर दरम्‍यान धावणार आहे. या गाडीच्‍या ८ फेऱ्या होणार आहेत. ८, १५, २२, २९ नोव्‍हेंबर, ६, १३, २२ आणि २९ डिसेंबर रोजी ही एक्‍स्‍प्रेस सुरत रेल्‍वे स्‍थानकावरून सुटेल. ०९०७० क्रमांकाची ब्रह्मपूर-सुरत एक्‍स्‍प्रेस १०,१७, २४ नोव्‍हेंबर तसेच १, ८, १५, २२ आणि २९ डिसेंबर रोजी धावणार आहे. ही एक्‍स्‍प्रेस महाराष्‍ट्रात नंदूरबार, धरणगाव, पाळधी, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, बल्‍लारशाह येथे थांबणार आहे. आश्‍चर्य म्‍हणजे महत्‍वाच्‍या बडनेरा रेल्‍वे स्‍थानकावर या गाडीला थांबा देण्‍यात आलेला नाही.

हेही वाचा… नेट परीक्षा डिसेंबरमध्ये; ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, बडनेरा रेल्वे स्थानकावर हावडा ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या तब्बल नऊ रेल्‍वेगाड्या थांबत नाहीत. त्यात कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी, टाटानगर अंत्योदय, पुरी-सुरत, हावडा-सीएसएमटी दुरांतो, भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस, पुरी-गांधीधाम, पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस, हावडा-पुणे दुरांतो, हावडा-शिर्डी, या एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यातील काही रेल्वेगाड्या या वर्धा, अकोला या ठिकाणी थांबतात; पण बडनेरा स्थानकाला तेही भाग्य मिळू नये, ही शोकांतिका असून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्‍यासाठी कारणीभूत असल्‍याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.