जन्मदात्या वडिलाने दोन चिमुकल्या मुलांना विष देऊन ठार केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संजय श्रीराम कांबळे (४०) असे पित्याचे, तर सुमित (७), मिस्टी (३) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.वरोरा तालुक्यातील बोर्ड येथे संजय कांबळे हे कुटुंबीयांसह राहतात. खासगी शिकवणी हा त्यांचा व्यवसाय होता. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांची पत्नी प्रणिता (३५) ही एका महाविद्यालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीवर आहे. त्यांच्या संसारवेलीवर सुमित आणि मिस्टी, अशी दोन फुले उमलली. संसार सुखात सुरू होता.

परंतु, मागील काही दिवसांपासून कांबळे यांची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते.शुक्रवारी सकाळी पत्नी प्रणिता महाविद्यालयात कामानिमित्त गेली होती. सुमित आणि मिस्टी ही दोन्ही मुले वडील संजय कांबळे यांच्यासोबत घरी होती. सायंकाळी प्रणिता घरी आल्या असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता. घराचा दरवाजा उघडून बघितले असता त्यांना मोठा धक्का बसला. दोन्ही मुले पलंगावर पडलेली होती. तोंडातून फेस बाहेर आलेला होता.

हेही वाचा : नागपूर : दारू चोरून प्यायल्याच्या संशयावरून मजुराला पेटवण्याचा प्रयत्न ; नरखेड तालुक्यातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या ओरडण्याने शेजारच्या नागरिकांनी धाव घेतली. दोन्ही मुलांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले. दरम्यान, कांबळे यांचा मृतदेह आज सकाळी समुद्रपूर गावापासून काही अंतरावरील साखरा गावाच्या शेतशिवारात आढळून आला.वडिलाने दोन्ही मुलांना आधी विष दिले. त्यानंतर गळा आवळून त्यांचा खून केला आणि साखरा शेतशिवारात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. कांबळे यांनी हे पाऊल आर्थिक विवंचनेतून उचलले की त्यामागे अन्य काही कारणे होती, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेची तक्रार वरोरा पोलिसांत करण्यात आली आहे.