नागपूर : राज्यात आत्ता कुठे गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसातच हुडहुडी भरवणारी थंडीही येणार हे अपेक्षित असतानाच आता पावसाचा अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे थंडीच्या आनंदावर विरजन पडणार आहे हे नक्की!

हवामान खाते काय म्हणते?

राज्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास तापमानाचे हलके चटके अजूनही जाणवत असले तरीही सायंकाळनंतर मात्र हवेत गारठा जाणवत आहे. पहाटेच्या सुमारास त्यात आणखीच वाढ होत आहे. राज्यातील वातावरणात चढउतार होत असतानाच आता पावसाचा नवा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा >>>नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा

पावसाच्या सरी कुठे व कधीपासून?

राज्यातील काही भागात येत्या गुरुवारपासून हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोबतच पावसाचा पुढील पाच दिवसाचा अंदाज देखील जाहीर केला आहे. बुधवार, १३ नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडेच राहणार आहे, पण गुरुवार, १४ नोव्हेंबरपासून मात्र अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज आहे.

जोरदार पावसाची शक्यता कुठे?

कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात गुरुवारी काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली जिल्ह्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडेच राहील, असा अंदाज आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज आहे.

हेही वाचा >>>विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”

देशातल्या इतर राज्यातील स्थिती काय?

तामीळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल, केरळ याठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत तामीळनाडू येथे मुसळधार, १४ नोव्हेंबरपर्यंत आंध्रप्रदेश, यानम आणि रायलसीमा, १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान केरळ, १४ नोव्हेंबरला किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील थंडीची स्थिती कशी ?

महाराष्ट्रातील किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. उर्वरित राज्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा आहे. १५ नोव्हेंबरनंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. याशिवाय राजधानी दिल्लीसह देशातील इतर भागातही किमान तापमानात घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे याठिकाणी थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.