नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी आलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणासाठी पैसे मोजल्यावरही पहिल्याच दिवशी उपाशी राहण्याची पाळी आली. या जेवण न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी शेवटी जेवण वाटल्या जाणाऱ्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारापुढील स्टाॅलपुढे गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कडेकोट सुरक्षा देण्यासाठी राज्यातील विविध भागातील पोलीस उपराजधानीत तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांना माफक दरात चांगले जेवण उपलब्ध करण्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले गेले. तर जेवणाची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना २५० रुपयांत दहा दिवसांच्या जेवणाचे कुपन देण्यात आले होते. पहिल्या दिवशी एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी जेवणाचे कुपन घेतले असतानाही विधान भवनाच्या प्रवेशद्वारापुढे सुमारे २५० ते ३०० कर्मचाऱ्यांचेच जेवण पोहचले.

हेही वाचा: नागपूर: एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारी सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी आजपासून उपोषण

हे जेवण संपल्यावर लवकरच दुसऱ्या टप्यात जेवण येणार असल्याचे इतर उपस्थितांना कळवले गेले. त्याला एक तास उलटला. काही वेळाने येथून वरिष्ठ अधिकारीही गायब झाले. हा प्रकार बघत उपाशी कर्मचाऱ्यांनी येथे गोंधळ घालत जेवणासाठी घेतलेले पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी जेवण वाटप करणाऱ्या पोलीस वेलफेअर विभागातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची मागणी होऊ लागली. त्यावर या कर्मचाऱ्यांसह उपाशी कर्मचाऱ्यांत शाब्दिक चकमक झाली. उपाशी कर्मचाऱ्यांनी आम्ही बाहेरगावावरून नागपुरात आलो आहोत. येथे जेवणासाठी एक आठवड्याचे कुपन मागितल्यावरही जबरदस्ती दहा दिवसांचे कुपन घेण्याची सक्ती करण्यात आली. त्यानंतरही पहिल्याच दिवशी जेवण दिले नसल्याने हे पैसे परत केले जाणार काय? हा प्रश्न उपाशी कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. दरम्यान, येथे उपाशी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित करत संबंधितावर कारवाई होणार काय? हा प्रश्नही संतप्त कर्मचारी उपस्थित करत होते.

जेवणाच्या कुपनवर शुल्काची नोंदच नाही

पोलीस कर्मचाऱ्यांना दहा दिवसांच्या जेवणासाठी प्रत्येक दिवसाला एक असे एकूण १० कुपन २५० रुपये घेऊन दिले गेले. या कुपनावर जेवणाचे कोणतेही शुल्क नमूद केले नसल्याचेही संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोमवारी शेकडो कर्मचाऱ्यांवर चुकीच्या जेवण व्यवस्थापनामुळे उपाशी राहण्याची वेळ आली. किमान दुसऱ्या दिवशी मंगळवारी सगळ्यांना जेवण योग्यरित्या मिळणार काय? हा प्रश्न येथे कर्मचाऱ्यांकडूनच उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: विभागीय वनाधिकारी संवर्गातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त; वन्यजीव संरक्षण वृक्ष लागवडीच्या कामावर परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकृष्ट जेवणामुळे पोलिसांचा नकार

मॉरीज कॉलेज चौक आणि टेकडी रोडजवळील मोर्चा पॉईंटवर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आलेले जेवण निकृष्ट होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी जेवण घेतले नाही. काहींनी अर्धपोटी राहून जेवण परत केले. तर अनेक कर्मचाऱ्यांवर समोसे-ब्रेड खाऊन बंदोबस्त करण्याची वेळ आली. सायंकाळी मोर्चे संपल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या चहाठेल्यावर गर्दी करीत नाश्त्यावर दिवस काढला. जेवणाच्या कंत्राटदाराने ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासून कंत्राट मिळवल्याची चर्चा होती.