वर्धा : सरकारी नौकरीत पदोन्नती मिळण्याची सर्वांनाच आस लागून असते. अनेक वर्षाची सेवा केली की मग प्रमोशन कधी, असे प्रश्न सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना हमखास विचारल्या जातात. पदोन्नतीची भेट आणि ती पण ऐन दिवाळीत मिळाली असेल तर मग आनंदास पारावार उरत नाही. ही अशीच भेट २० ऑक्टोबरला राज्य शासनाने जाहीर केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने अ गटातील शिक्षणाधिकारी यांना पदोन्नती दिली आहे. ते आता शिक्षण उपसंचालक दर्जाचे अधिकारी होणार. त्यात या नावांचा समावेश आहे. कैलास दातखीळ यांना छत्रपती संभाजीनगरला उपसंचालक पद मिळाले आहे. दीपक माळी यांना राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिवपद देण्यात आले. तेजराव काळे हे पूण्यात शिक्षण उपसंचालक, पुष्पावती पाटील पूणे प्राथमिक उपसंचालक, सुचिता रोडगे संभाजीनगरला, स्मिता गौड पूणे, भावना राजनोर या मंत्रालयात शिक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी, प्रिया शिंदे उपायुक्त, राज्य परीक्षा परिषद, एकनाथ आंबोकार पूणे अशी विविध पदावर पदोन्नती झाली आहे.

त्यांना ६७७०० – २०८७०० अशी वेतनश्रेणी लाभणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरूपात या नियुक्त्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणून नियमितपणाचा व सेवा ज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही. सदर पदोन्नतीनुसार देण्यात आलेली पद स्थापना सामान्य प्रशासन विभागाच्या विभागीय संवर्ग वाटपच्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.

तरतुदीनुसार ज्या अधिकाऱ्यावर शिस्तभंग विषयक कार्यवाही सूरू झाली असेल अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अश्या अधिकाऱ्यांस पदोन्नतीने पद स्थापनेच्या ठिकाणी पद स्थापना देण्यात येवू नये, असे आदेशात नमूद आहे. शिक्षण आयुक्तानी संबंधित अधिकाऱ्यांस पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करायची आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याने ३० दिवसाच्या आंत पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे.

या नियुक्त्या तर शासन आदेशानुसार झाल्या आहेत. मात्र या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन आहेत. तसेच ७ मे २९२१ रोजीच्या शासन निर्णय प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात राहणार, असे शालेय शिक्षण विभागाच्या २० ऑक्टोबरच्या आदेशात नमूद आहेत.