नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी तिसरी अमृत भारत एक्स्प्रेस (क्रमांक १५२९४/१५२९५) मुजफ्फरपूर ते चारलापल्ली दरम्यान साप्ताहिक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ही सुपरफास्ट गाडी १४ ऑक्टोबरपासून नियमितपणे धावणार आह

नागपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांना महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या सहा राज्यांशी जोडणारा आरामदायी आणि वेगवानप्रवासाचा पर्याय यामुळे उपलब्ध होणार आहे. नागपूर विभागातील प्रवाशांसाठी ही गाडी विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीची ठरणार आहे.

नागपूर स्थानकावर गाडी क्रमांक १५२९४ (मुजफ्फरपूर-चारलापल्ली) बुधवारी दुपारी १२.३० वाजता येईल आणि १२.३५ वाजता पुढे जाईल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १५२९५ (चारलापल्ली-मुजफ्फरपूर) गुरुवारी दुपारी १.२५ वाजता नागपूर स्थानकावर येईल आणि १.३० वाजता सुटेल. बल्लारशा जंक्शन येथेही या गाडीला थांबा आहे. येथे बुधवारी सायंकाळी ५.१० ते ५.१५ (मुजफ्फरपूर-चारलापल्ली) आणि गुरुवारी १०.१५ ते १०.२० (चारलापल्ली-मुजफ्फरपूर) दरम्यान थांबेल. ही गाडी एकूण २२ डब्यांची आहे.

गाडी क्रमांक १५२९४ (मुजफ्फरपूर-चारलापल्ली): मुजफ्फरपूर येथून मंगळवारी सकाळी १०:४० वाजता सुटेल आणि चारलापल्लीला दुसऱ्या दिवशी (बुधवारी) रात्री ११.५० वाजता पोहोचेल. पहिली नियमित सेवा १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल.

गाडी क्रमांक १५२९५ (चारलापल्ली-मुजफ्फरपूर): चारलापल्ली येथून गुरुवारी पहाटे ४.०५ वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. पहिली नियमित सेवा १६ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल.

ही गाडी हाजीपूर, सोनपूर, पाटलीपुत्र, दानापूर, आरा, बक्सर, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज चौकी, सतना, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, नागपूर, बल्लारशा, सिरपूर कागजनगर, बेल्लमपल्ली, रामागुंडम, पेद्दापल्ली, काजीपेट या स्थानकावर थांबणार आहे.

तसेच नागपूर मार्गे आणखी एक अमृत भारत एक्सप्रेस धावत आहे.

ब्रह्मपूर – उधना अमृत भारत एक्सप्रेस

गाडी क्रमांक: १९०२१/ १९०२२

मार्ग: ब्रह्मपूर (ओडिशा) ते उधना (सूरत, गुजरात)

नागपूर स्थानकावर आगमन:

ब्रह्मपूरहून: दर सोमवारी, संध्याकाळी ७:००

उधनाहून: दर रविवारी, सकाळी ७:४०

प्रमुख थांबे: विशाखापट्टणम, रायपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, भुसावळ, जळगाव, नंदुरबार

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा

या दोन्ही गाड्यांमध्ये एकूण २२ एलएचबी डबे असून, त्यात स्लीपर आणि सामान्य डबे, स्वच्छतागृह, वायुवीजन प्रणाली, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि चांगली आसनव्यवस्था आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे.

सात राज्यांमध्ये थेट संपर्क

या गाड्यांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगाणा, ओडिशा आणि गुजरात या राज्यांमध्ये नागपूरमार्गे थेट रेल्वे सेवा सुरू झाली असून, व्यापारी, विद्यार्थी व प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरली आहे.