लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत उन्हाचा तडाखा सुरू असून शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासात तीन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले. या मृत्यूंची नोंद उष्माघात संशयित म्हणून होण्याची शक्यता आहे. परंतु, नागपूर महापालिकेच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

नागपूरच्या विविध भागात आढळलेल्या तीन मृतदेहापैकी एक ७० ते ७५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पंचशील चौकातील दुभाजकावर, ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मोहन नगर परिसरात, ४० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह महादुला टी पॉईंट, सर्व्हिस रोडच्या शेजारी आढळला. या मृत्यूंची नोंद उष्माघात संशयित म्हणून होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही नागपूर महापालिकेने तीन संशयित उष्माघाताच्या मृत्यूची नोंद केली आहे. त्याचेही करण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.

आणखी वाचा-भुकेने व्याकूळ अनाथ मुलाने नेपाळहून गाठले नागपूर

पूर्व विदर्भात आतापर्यंत उष्माघाताचे केवळ १७ रुग्णच आढळले आहेत. त्यापैकी एक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार, पूर्व विदर्भात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण हे गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात आढळले. या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी ६ रुग्ण नोंदवण्यात आले. तर भंडारा जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात २, नागपूर जिल्ह्यात १, वर्धा जिल्ह्यात केवळ १ रुग्णाची नोंद झाली. नागपूरसह पूर्व विदर्भाच्या सहाही जिल्ह्यात सूर्य कोपल्याने तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले आहे. सहा जिल्ह्यात उष्माघाताच्या केवळ १७ रुग्णांची नोंद झाल्याने येथील खासगी रुग्णालयाकडून उष्माघाताच्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला दिली जाते काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. उष्माघाताच्या आकडेवारीला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

आणखी वाचा-धक्कादायक! प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत कापड…

उपराजधानीत १०० रुग्णशय्या

नागपूर महापालिकेच्या विविध यंत्रणांनी शहराच्या विविध भागात उष्माघात नियंत्रणासाठी ३३८ पाणपोई, विविध उद्यानात १६७ पाणपोई, ४०० बेघरांची सोय होईल असे निवारागृह, महापालिकेच्या रुग्णालयांसह मेडिकल आणि मेयो या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये शीतवार्ड सुरू करून १०० रुग्णशय्येसह आवश्यक औषधांची सोय केल्याचे नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष

तापमान वाढल्याने आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. येथे रुग्णांसाठी कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, औषधोपचारासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत. उष्माघाताबाबत जनजागृती केली जात आहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.