नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आषाढी एकादशीच्या दिवशी सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांकडून मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या कारणाची माहिती आपण जाणून घेऊ या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे राज्याच्या विविध भागासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लुट थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागातून ५ हजार २०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.

राज्यात मागील अनेक वर्षांपासून विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून करत आहे. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची अडचण येऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निमित्ताने माणसातील ” विठुराया” ची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. अर्थात, हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

या भागात जेवणारी सोय…

आषाढी वारीच्या काळात ५ जुलै, ६ जुलै आणि ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील, अशी माहिती महामंडळाकडून दिली गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे वाचणार

एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातील इतर महामंडळाच्या तुलनेत खुपच कमी वेतन आहे. त्यातच राज्यातील काही भागात यात्रा भरल्यास तेथे जेवणासह इतरही वस्तूंचे दर वाढवत असतात. त्यामुळे तेथे सेवेवर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर जेवनासह इतर गोष्टींचा अतिरिक्त भुर्दंड पडतो. परंतु यंदा एसटी कर्मचाऱ्यांना नि:शुल्क जेवण मिळणार असल्याने त्यांचे दोन पैसे वाचण्यास मदत मिळणार असल्याची भावना एसटीचे कर्मचारी बोलून दाखवत आहे.