नागपूर : वादग्रस्त जनसुरक्षा विधेयक उभय सभागृहाने मंजूर केल्यानंतर विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी त्यास विरोध दर्शवला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भूमिका मांडली तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबत भिती व्यक्त केली आहे.

वादग्रस्त जनसुरक्षा विधेयक विधानसभेत विरोधकांनी पाठिंबा दर्शविल्याने ते बहुमताने मंजूर झाले होते. त्यावरून विविध नागरी व सामाजिक संघटनांनी टीका सुरू केली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे), काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी विधानपरिषदेत आक्षेप घेतला होता. हा कायदा काही संघटनांवर बंदी घालण्यासाठी, त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आणण्यात आला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यावर त्या डाव्या ६४ संघटनांची नावे जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर या कायद्याचा भाजप सरकार ईडी सारखा दुरूपयोग करण्याचा धोका असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांसाठी धोकादायक आहे. या कायद्याचा वापर भाजप सरकार ईडीसारखा करण्याची शक्यता आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

देशमुख म्हणाले, शेतकरी, विद्यार्थी किंवा डाव्या विचारसरणीचे लोक यांनी आंदोलन केले तर त्यांना जनसुरक्षा कायद्याची भीती आहे. दहशतवादाविरुद्ध आणि अंमली पदार्थांकरिता आर्थिक पुरवठा होऊ नये म्हणून २००४ मध्ये मनी लॉड्रगिं प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) केंद्र सरकारने आणला. त्या. कायद्याचा वापर इतर देशात दहशतवाद आणि अमली पदार्थ यांच्याविरोधात केला जातो. पण भारतात ईडीला हाताशी धरून राजकीय आकसापोटी या कायदाचा वापर केला जात आहे. त्याच पद्धतीने जनसुरक्षा या कायदाचा वापर होण्याची भीती आहे, असेही देशमुख म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मधल्या काळात काही व्यापाऱ्यांनी खंडणीचे तर त्याच्या खात्यातील काही लोकांनी भ्रष्टाचारात आरोप केले. याची चौकशी महाराष्ट्र पोलीस चांगल्या पद्धतीने करत असताना त्याचा तपास सीबीआयकडे तपास दिला गेला, तेव्हाच भाजप सरकार त्यांना वाचवत आहे हे स्पष्ट झाले, असा दावा देशमुख यांनी केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीबीआयने दोन गुन्ह्यात क्लीन चिट दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते, याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले.