नागपूर : कर्नाटक निवडणुकीचा प्रचार… नागपुरात असेल तर लोकांशी जनसंपर्क… विविध कार्यक्रमांना भेटी… या सर्व धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी सायंकाळी नागपुरात आपल्या नातीला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी चक्क सीताबर्डी येथील एका सायकलच्या दुकानात गेले. त्यांनी त्यांची दोन वर्षीय नात कावेरीच्या वाढदिवसासाठी सायकल खरेदी केली.
गडकरी नागपुरात असले की बैठक, कार्यक्रम, लोकांशी जनसंपर्क यात व्यस्त असतात. त्यातही नातवांसोबत ते वेळ घालवतात. शनिवारी ते आपल्या नातवंडांची फर्माईश पूर्ण करण्यात रमलेले बघायला मिळाले. यावेळी नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी व इतर नातवंडांचा गोतावळा होता.
हेही वाचा – चंद्रपूर : अंत्यसंस्कार करतेवेळी मधमाश्यांचा हल्ला, ४२ जखमी
चक्क नितीन गडकरी हेच दुकानात आले म्हटल्यावर दुकानदारदेखील आश्चर्यचकित झाले होते. या आधीदेखील नितीन गडकरी आपल्या नातवंडांसाठी शॉपिंग करताना दिसून आले आहेत. प्रसंग गणेशोत्सवाचा असो, पोळा असो किंवा दिवाळी, नितिन गडकरी अनेकदा नातवंडांना घेऊन बाजारात शॉपिंगसाठी बाहेर पडतात. शनिवारी त्यांनी सहकुटुंब बाजारात नातीसाठी सायकलसह विविध वस्तूंची खरेदी केली. तसेच ते कधी संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्येदेखील जेवणासाठी जात असतात.