नागपूर : विश्व हिंदू परिषदेने २० सप्टेंबर २०२५ रोजी नागपुरात झालेल्या पत्रपरिषदेत मुस्लिमांना गरबा उत्सवात प्रवेश देऊ नये, असे फरमान आयोजन करणाऱ्या मंडळासाठी काढले होते. त्यासाठी गरबाला येणाऱ्या प्रत्येकाला वहार देवतेचे (वराह प्राणी) पुजनानंतरच प्रवेश देण्याची मागणीही केली होती.

परंतु भाजपच्या महिला नेत्यांकडून लवकरच आयोजित होणाऱ्या गरबा आणि गरबा स्पर्धेत मात्र मुस्लिम महिला इच्छुक असल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले. हे प्रकरण नेमके काय? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे २० सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते ती, नवरात्रात गरबा उत्सव मंडळात येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड व धर्म तपासूनच आत प्रवेश द्यावा, प्रवेश घेणाऱ्याच्या मस्तकावर टिळा लावावा, तसेच वराह देवतेचे पूजन करायला लावावे.

काही विधर्मी (मुस्लिम समाज) वराहापासून घृणा करतात, त्यामुळे वराहदेवतेचे चित्र पाहून ते गरबा उत्सव मंडळापासून दूर राहतील, असेही तितरे म्हणाले. वराह देवता आणि नवरात्राचा तसा धार्मिक संबंध नसला, तरी ती आमची देवता आहे. काही विधर्मींना वराह दर्शन केल्याने धर्म नष्ट होते, असे वाटते. म्हणून आम्ही तशी अट घातल्याचेही, तितरे यांनी सांगितले होते.

दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी या अटींचे पालन प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात करावे म्हणून त्यांच्याशी संपर्क करत असल्याचेही सांगितले होते. या घटनेमुळे वाद उद्भवला असतांनाच भाजपच्या महिला नेता व माजी महापौर अर्चना डेहनकर यांनीही या मुद्यावर महत्वपूर्ण भाष्य केले.

भाजपशी संबंधित महिला नेत्यांकडून मध्य नागपुरात आमदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जाते. त्यांच्यासह महिला जागृती जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेकडून यंदा २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान अश्विन नवरात्रीनिमित्त महिलांसाठी रास गरबा व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी प्रेस क्लबमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्चना डेहनकर यांना मुस्लिमांना गरबा व स्पर्धेत प्रवेश देणार काय? त्यावर डेहनकर म्हणाल्या, मुस्लिम महिला जर हिंदूत्वला मानत असल्यास व या धर्माचा आदर करत असल्यास त्यांना प्रवेश दिला जाईल. त्यांना मुस्लिम म्हणून विरोध करण्याचा प्रश्नच नाही. दरम्यान डेहनकर यांनी यावेळी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देत त्यासाठी असलेल्या पुरस्काराबाबतही माहिती दिली.