वर्धा : क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. एक हसरं चौकोनी कुटुंब संपले. वर्धा तालुक्यातील तरोडा येथे हा अपघात सोमवारी रात्री घडला. त्यात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी व दोन मुलं ठार झाले आहेत. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी सात वाजता त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार वैद्य हे कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश ६ व मुलगी माही वर्ष ३ हे पण होते.

महाप्रसाद कार्यक्रम आटोपून ते आपल्या एम एच ४० – ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीने परत निघाले होते. वर्ध्याकडे येत असतांना मांडगावजवळ रस्त्याच्या मधोमध रानडुक्कर गाडीपुढे आले. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाडी समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. मोठा अपघात घडला. घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य व त्यांची मुलगी रुग्णालयात मरण पावले. रात्री ११ वाजता ही घटना घडल्याचे समजते.तरोडा हायवे वर हा अपघात घडला. टँकर एम एच ०९ सी व्ही २१८५ या गाडीस अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर ही गाडी वेगात धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगितल्या जाते. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे व काकडे हे पोहचले होते. जखमी झालेल्यांना प्रथम सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्या गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात घडल्याचे माहित होताच लगतचे गावकरी धावून आले. त्यांनी पोलीस विभागास माहिती देत रुग्णवाहीका बोलावून घेतली. त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले.वैद्य हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवासी होते. एकाच अपघातात सर्व कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त केल्या जात आहे.अपघातग्रस्त कारची स्थिती समोरून चेंदामेंदा झाल्यागत आहे. सोमवारी रात्री झालेला हा अपघात भयावह असल्याचे घटनास्थळीचे चित्र आहे. या अपघातास कारण ठरलेला रानडुक्कर पण तिथेच ठोस बसल्याने मृत झाला.