शनिवारी सर्वाच्या लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी  होणार असल्याने त्याच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. करोनामुळे मूर्ती खरेदीपासून ती घरी आणण्यासाठी भाविकांकडून तसेच विक्रेत्यांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य पसरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीला महिनाभर आधीच सुरुवात के ली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी रस्त्यावरील मोक्याच्या जागा अडवत मंडप टाकले जातात. काही ठिकाणी चौफुलीवरच सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप टाकला जातो. या भाऊगर्दीत घरगुती गणेशोत्सवाचा थाट वेगळा असतो. यंदा मात्र करोनामुळे उत्सवाचा रंग फिका असून बाजारपेठेतही सामसूम आहे. यंदा पाऊस आणि करोनामुळे कोकणातील पेण, रत्नागिरीच्या शाडू मूर्तीची वाहतूक करण्यात अडचण आली. यामुळे जिल्हा परिसरात तसेच जवळच्या भागातून मूर्ती मागविण्यात आल्या. शहरातील काही मूर्तिकारांनी उपलब्ध माती तसेच अन्य साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार केल्या. मूर्ती खरेदीस अद्याप प्रतिसाद लाभत नसल्याने विक्रेते चिंतेत आहेत. शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानासह अन्य ठिकाणी मूर्ती विक्री केंद्र आहेत.

गणेशोत्सवास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाही मूर्ती विक्रीस अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पीओपीच्या मूर्ती २५१ रुपयांपासून विक्रीस आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरीकडे, मूर्ती खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मूर्ती जवळून पाहण्यास अडचणी येत आहेत. करोनाचा संसर्ग पाहता विक्रेत्यांनी मूर्तीला ग्राहकांचा थेट स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली आहे. यामध्ये सॅनिटायझरचा वापर, मूर्ती देता-घेताना हातमोजे, मुखपट्टी अनिवार्य करण्यात आली आहे.

‘लालबागचा राजा’ला अधिक मागणी

बाजारात विविध रूपातील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लालबागचा राजा आणि लोड गणेशाला अधिक मागणी आहे.  प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, बीज गणेश असे विविध मूर्तीचे पर्याय खुले आहेत. पीओपी तसेच शाडू मातीमध्ये बाल गणेश, दगडुशेठ, दागिना गणेश, कृष्ण गणेश अशा वेगवेगळ्या रूपातील गणेशमूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत, असे  मनाचा राजा कला केंद्राचे गणेश खिरोडे यांनी सांगितले.