नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची ग्वाही

नाशिक : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. रस्त्यावर कोणी धिंगाणा घातला, विनापरवानगी फेरी काढली, आंदोलन वा तत्सम कारणांमुळे वाहतुकीत अडथळे आणल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोलीस यंत्रणेची काम करण्याची नियमावली आहे. त्या चौकटीत गुन्हेगारांना औषधाचा योग्य तो डोस दिला जाईल, असेही त्यांनी सूचित केले.

रोलेट वा जुगारसारखे अवैध धंदे, अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक-विक्री रोखण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. जुगार वा तत्सम बाबींसाठी लॉटरी विभाग, अवैध प्रवासी वाहतुकीवर आरटीओ आणि अवैध मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. त्यांनी आपले काम चोख बजावणे आवश्यक आहे. संबंधितांना पत्राद्वारे कल्पना दिली जाईल. पोलिसांची मदत लागल्यास ती उपलब्ध केली जाईल.

संबंधितांकडून कारवाई न झाल्यास पोलीस आपले काम करतील, असे ते म्हणाले. शहरात प्रदीर्घ काळापासून सोनसाखळी चोरीच्या घटना नियंत्रणात आलेल्या नाहीत. याविषयी पांडे यांनी पोलीस असल्याची बतावणी करून बॅगा लंपास करणे किं वा सोनसाखळी चोरीसारख्या घटनांमध्ये इराणी टोळ्या, मध्य प्रदेश, नगर जिल्ह्य़ातील काही टोळ्यांचा सहभाग असतो, असे सांगितले. मुंब्रालगतचा भाग, उल्हासनगरमध्ये तर हा पिढीजात व्यवसाय झाला आहे. करोनाकाळात गुन्ह्य़ाचे प्रमाण कमी झाले होते. निर्बंध हटल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाणही पुन्हा नेहमीप्रमाणे होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

..तर मग पुरावा द्या !

याआधीच्या काही पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’, सराईत गुन्हेगारांची अकस्मात तपासणी यांसारख्या मोहिमा राबविल्या. त्या यापुढे कायम राहतील का, या प्रश्नावर पांडे यांनी गुन्हेगारांवर वचक नियमावलीनुसार सर्व उपाय योजले जातील. पोलीस नियमावलीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठीच्या अनेक बाबी आहेत. गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहून गुन्हेगारांना औषध देण्याची तरतूद आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ महत्त्वाचे आहे; परंतु त्याने गुन्हे थांबतील असे वाटत असेल तर त्याचा पुरावा द्यावा, असा प्रश्न पांडे यांनी विचारून सर्वानाच चकित के ले. तडिपारी, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा आदींद्वारे गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सूचित केले.

नियमावलीच्या चौकटीत काम

पोलीस नियमावलीत यंत्रणेची कार्यपद्धती असते. ही नियमावली आणि शासन निर्देश यानुसार पारदर्शकपणे काम केले जाईल. नियमावलीच्या चौकटीत वेगळ्या पद्धतीने काम करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाईल. ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये आपण सेवा देण्यासाठी आलो आहोत. नागरिकांना पोलीस यंत्रणेचे काम समाधानकारक वाटणे महत्त्वाचे आहे. यासाठी पूर्वीच्या काही योजना, पद्धती पुढे सुरू ठेवण्यास अडचण नाही.

– दीपक पांडे (पोलीस आयुक्त, नाशिक)