करोनासंबंधी समाज माध्यमे आणि डिजिटल व्यासपीठावर दोन समाजात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही प्रक्षोभक, आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफितीच्या प्रसारणाला आता त्या त्या गटाच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाणार आहे. काही दिवसांपासून समाजमाध्यमातून करोनासंबंधी अनेक संदेश फिरत असून अगदी औषधोपचारापासून ते धार्मिक तेढ वाढविण्यापर्यंतच्या संदेशाचा यामध्ये समावेश आहे. अधिकृत स्त्रोतांकडून खातरजमा न करता परस्पर कोणतीही माहिती पाठविण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबतचे मनाई आदेश दिले आहेत.

करोनामुळे समाजमाध्यमात वेगवेगळ्या अफवा  पसरत आहेत. समाज विघातक, गुन्हेगारी वृत्तीची मंडळी दोन समाजांमध्ये तेढ होईल अशा अफवा, करोनाबाधित व्यक्तींची संख्या, उपचार, बळी पडलेल्या रुग्णांची संख्या, संशयित व्यक्ती याबद्दल कोणतीही खातरजमा न करता माहिती समाज माध्यमांतून पसरविली जात आहे. यामुळे सार्वजनिक शांतता, कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी अंधश्रध्दा निर्माण करणारे औषधोपचार, धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे संदेश पसरविण्यास प्रतिबंध केला आहे. समाज माध्यम, लघूसंदेश, व्हॉट्सअ‍ॅप, टिकटॉक, टेलिग्राम, वा इतर कोणताही डिजिटल व्यासपीठाद्वारे प्रक्षोभक, आक्षेपार्ह संदेश, चित्रफित कोणीही प्रसारित करणार नाही. या माध्यमात असा प्रकार घडल्यास या माहितीच्या प्रसारणासाठी त्या व्यासपीठाचे अ‍ॅडमिन जबाबदार राहतील, असे सूचित करण्यात आले आहे.