नाशिक : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कची अनिवार्यता, शारीरिक अंतर याच्या अंमलबजावणीकडे पोलिसांचे विशेष लक्ष असले तरी सद्यस्थितीत टाळेबंदी काहीशी शिथील करण्यात आल्याचा फायदा नागरीक घेत आहेत. मास्क न लावता, शारीरिक अंतराचे भान न ठेवता बाजारपेठेसह अन्य ठिकाणी नाशिककर संचार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपल्या शैलीत समज देत आतापर्यंत पाच हजाराहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. करोनाग्रस्तांनी ६०० चा टप्पा गाठूनही नागरिकांमध्ये अद्याप या आजाराविषयी गांभिर्य जाणवत नाही. टाळेबंदी असतांनाही क्षुल्लक कारणांवरून लोक आजही बाहेर पडत आहेत. अशा टवाळखोरांसाठी नाशिक पोलिसांनी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट सुरू केले. काहींना भर चौकात उठबशा काढायला सांगितल्या. तरीही बाहेर पडण्याऱ्यांची संख्या काही कमी झाली नाही. लोक खरेदीसाठी बाहेर पडतांना मास्क वापरत नसल्याने पोलिसांनी अशा नाठाळांकडून दंड वसूल करणे सुरू केले. आतापर्यंत पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत मद्य दुकांनाबाहेर झालेली गर्दी, मास्क न लावता बाहेर

पडलेले अशा पाच हजार ४६३ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.

याशिवाय टाळेबंदी असतांनाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची एक हजार ९८३ वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून चार लाख २६ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला असून अद्याप रूपये १८, ५२,९०० दंड प्रलंबित आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी मास्क वापरणे तसेच शारीरिक अंतराचा नियम पाळणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांना आपल्यामुळे व लोकांचा आपल्याला त्रास होणार नाही. तरीही काही लोक मास्क न लावता फिरतात. अशा लोकांना मास्क लावण्यास सांगितले जाते. अन्यथा माघारी फिरवले जाते. काहींवर गुन्हे दाखल होत आहेत.  लोकांनी सर्व नियमांचे पालन स्वयंस्फुर्तीने करणे अपेक्षित आहे.

– पंढरीनाथ ढोकणे  (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ)