बाधितांची संख्या तीन हजारपार

नाशिक : विभागात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत या आजाराने २५१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ११७, नाशिक ९६, धुळे २६, नंदुरबार तीन, अहमदनगर जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश आहे. रुग्ण वाढत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे. सद्यस्थितीत विभागात १३०६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

विभागातील करोनाच्या सद्यस्थितीची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पटणशेट्टी यांनी दिली. विभागात आतापर्यंत २९ हजार १३० जणांचे नमुने घेण्यात आले. २४ हजार ७०६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३००४ रुग्णांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. ९३ जणांचे अहवाल अनिर्णित असून १३०६ अहवाल प्रलंबित आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असून आतापर्यंत १७०० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १०४९ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी सकाळी नाशिक जिल्ह्यातील १६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील चार जणांचे अहवाल सकारात्मक, तर १२ जणांचे अहवाल नकारात्मक आले. बाधितांमध्ये इगतपुरी येथील तीन, तर नांदगावच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

यामुळे नाशिकची रुग्णसंख्या १५२१ वर पोहचली आहे. यापैकी १००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ९६ जणांचा मृत्यू झाला. सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात २१५, नाशिक ग्रामीणमध्ये ९४ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात ९९ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील २९५ अहवाल प्रलंबित आहेत. जळगावमध्ये मृत्यूची संख्या अधिक असल्याने चिंता वाढली आहे. एकूण बाधितांचा आकडा १०६३ वर पोहचला असून उपचारानंतर ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या ४२५ रुग्ण उपचार घेत आहेत. या जिल्ह्याचे तब्बल ७७५ अहवाल प्रलंबित आहेत.

धुळे जिल्ह्यात करोनाचे २१९ रुग्ण आढळले. त्यातील ९७ रुग्ण बरे झाले. सध्या ९६ रुग्ण उपचार घेत असून २७३ अहवाल प्रलंबित आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ३७ जणांना करोनाची लागण झाली. यातील २८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यातील २१ संशयित रुग्णांचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. नगर जिल्ह्यात करोनाचे २०७ रुग्ण आढळले. त्यातील ९१ जण बरे झाले असून १०७ रुग्ण उपचार घेत असल्याचे डॉ. पटणशेट्टी यांनी सांगितले. या जिल्ह्यातील २६ अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील एकूण आकडेवारीत मालेगावचे प्रमाण अधिक आहे. मालेगाव महापाालिका क्षेत्रात विभागात सर्वाधिक ७६५ रुग्ण आढळले. यातील ६०४ रुग्णांनी करोनावर मात केली. ४८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ११३ रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक शहरात करोनाची रुग्णसंख्या ३६६ वर पोहचली. त्यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअंती १३३ रुग्ण बरे झाले. सध्या २१५ रुग्ण उपचार घेत आहेत.