नाशिक: शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात शुक्रवारी दोन बिबट्यांचा संचार आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली. वन विभागाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सिडकोतील रायगड चौकात बिबट्याला जेरबंद केले. तर, गोविंद नगरमधील अशोका प्राईड इमारतीत एका सदनिकेत शिरलेल्या बिबट्याला जागरुक डॉक्टराने खोलीत बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या खोलीतील बिबट्याला बेशुध्द करून ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सिडकोत बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे जेरबंद करण्याच्या कार्यात अडथळे आले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

यापूर्वी अनेकदा शहरातील वेगवेगळ्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात दोन बिबट्यांचे आगमन झाल्यामुळे वन विभागाची दमछाक झाली. सिडकोतील सावता नगरात शुक्रवारी पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या रहिवाशांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आल्यावर त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. बिबट्याचा वावर सीसी टीव्हीमध्ये कैद झाला. सावतानगरातील विठ्ठल मंदिर, जीएसटी कार्यालय, लष्करी कार्यालय, जलकुंभ, अभ्यासिका परिसरात बिबट्याचा संचार आढळला. हा सर्व अतिशय दाटीवाटीचा रहिवासी भाग आहे. वन विभागाच्या पथकाने इंजेक्शन डागून बिबट्याला बेशुध्द केले. नंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. याच दरम्यान, गोविंदनगर भागात दुसरा बिबट्या शिरल्याची माहिती मिळाल्याने वन विभागाचे पथक लगेच तिकडे रवाना झाल्याचे वन अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले.

हेही वाचा… नाशिकमधील सिडकोत बिबट्याचा संचार; रहिवाशांमध्ये भीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोविंदनगरातील अशोका प्राईड इमारतीच्या तळ मजल्यावर वास्तव्यास असणारे डॉ. सुशील अहिरे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला सदनिकेतील एका खोलीत बंद करणे शक्य झाले. सकाळी ते कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. घरी परतल्यानंतर कुत्रा अकस्मात अस्वस्थ झाला. जोरात भुंकू लागला. हे पाहून डॉ. अहिरे यांनी आपल्या घरातील एका खोलीची पडताळणी केली असता बिबट्या दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही खोली बंद करून वन विभागाला माहिती दिली. बिबट्या घरात शिरला, तेव्हा डॉ. अहिरे यांची पत्नी घरातील दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. सुदैवाने बिबट्या अन्य खोलीत गेला. डॉक्टरांनी बिबट्याला खोलीत बंद केल्यामुळे निवासी भागात संभाव्य अनर्थ टळला. सदनिकेतील खोलीतील या बिबट्याला बेशुध्द करण्याचे नियोजन पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शहरात अनेक जण जखमी झाले आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सध्या लहान मुले इमारतीच्या प्रांगणात खेळत आहेत. याच सुमारास बिबट्याचा संचार भीतीदायक असल्याची भावना उमटत आहे.