देशात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळू लागल्याने जिल्ह्यातही आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. करोनाची लाट पुन्हा आल्यास आवश्यक उपाययोजना काय असतील याचा आढावा प्रशासकीय पातळीवर घेण्यास सुरूवात झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून हवेतून प्राणवायू शोषून घेत साठवणूक करणारे प्रकल्प आणि द्रव स्वरूपात उपल्बध प्राणवायूसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अद्याप करोना रुग्णांना प्राणवायूची गरज भासत नसल्याने गरजेप्रमाणे हा साठा अन्य रुग्णांसाठी आवश्यकता असल्यास वापरला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई: जगभरात वाढत्या करोनाच्या धर्तीवर मंगळवारी रुग्णालयांतील आरोग्य सुविधांचा आढावा घेणार

करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या कमतरतेमुळे झालेली मनुष्यहानी पाहता केंद्र सरकारने प्राणवायू प्रकल्प निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. जिल्ह्यात त्याअंतर्गत हवेतून प्राणवायू शोषून घेत त्याची साठवणूक करणारे प्रकल्प तयार करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही प्रकल्पाची उभारणी करत प्राणवायूची वाहतूक सोयीस्कर व्हावी, अशा ठिकाणी केंद्र तयार करण्यात आले. दोन्ही प्रकारातील प्रकल्प कार्यान्वित असल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सक तसेच करोनाचे मुख्य अधिकारी डॉ. अशोक थोरात यांनी केला. सद्यस्थितीत करोना रुग्णांची संख्या कमी असून त्यापैकी कोणालाही प्राणवायूची गरज भासत नाही. प्राणवायू हा बदलत्या हवामानामुळे दमा, अस्थमाच्या रुग्णांसाठी किरकोळ प्रमाणात वापरला जात आहे. मात्र करोनाचे रुग्ण अचानक वाढल्यास आवश्यक उपाययोजना आणि सूचना सर्व रुग्णालयांना करण्यात आल्या असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा >>> करोनाच्या नव्या व्हेरीयंटपासून वाचण्यासाठी मदत करतील ही १० उपकरणं; जाणून घ्या किंमत आणि उपयोग

३१ प्रकल्प कार्यान्वित

हवेतून प्राणवायू शोषून साठवणुक करणारे प्रकल्प जिल्हा शासकीय रुग्णालयासह येवला, मनमाड, चांदवड, कळवण , त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. पिंपळगाव, सिन्नर, इगतपुरी, वणी, अभोण, सुरगाणा, पेठ, झोडगे, घोटी, नांदगाव, लासलगाव, नगरसूल, उमराणे, नामपूर, सटाणा, देवळा, हरसूल, निफाड या ग्रामीण रुग्णालयातही हे प्रकल्प आहेत. एकूण ३१ प्रकल्प कार्यान्वित आहेत. द्रव स्वरूपात जिल्हा शासकीय रुग्णालय, मालेगाव सर्वसामान्य रुग्णालय, येवला, कळवण, निफाड, मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय, पिंपळगाव, सिन्नर, इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आहेत. एकूण १६ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यातील सात कार्यान्वित आहेत. अन्य प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

जिल्हा रुग्णालयात मुखपट्टी अनिवार्य

करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात चिकित्सा पेपर काढतांना, बाह्य रुग्ण विभागाच्या कुठल्याही कक्षात तपासणीसाठी जातांना रुग्ण आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adequate oxygen supply in nashik district health department update ahead of coronavirus zws
First published on: 26-12-2022 at 20:48 IST