लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आदिवासी बांधवाना हक्काचा रोजगार मिळावा, त्यांच्यातील कला कौशल्याला व्यासपीठ मिळावे यासाठी वन विभागाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अरण्यक विक्री केंद्राला प्रसिध्दीअभावी फटका बसत आहे. बांबुसह वेगवेगळी आदिवासी कलाकुसर असलेल्या वस्तु असूनही केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

येथील वन विभागाच्या वतीने नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील वन विभागाच्या मुख्य कार्यालयानजीक दोन वर्षापूर्वी अरण्यक हे विक्री केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी जिल्हयातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, उंबरठाण या भागातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या बांबुच्या वस्तु, मध अन्य काही वस्तु विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या माध्यमातून आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वनविभागाला काही अंशी महसूलही प्राप्त होत होता.

आणखी वाचा-देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

सद्यास्थितीत अरण्यक ज्या ठिकाणी सुरू होते. तेथील इमारत दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे हे केंद्र नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील फ्रावशी अकॅडमीनजीक असलेल्या वनविभागाच्या संपादित जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केंद्राला दुकानासारखे स्वरूप देण्यात आले आहे. सध्या नवरात्र आणि त्यानंतर येणारी दिवाळी पाहता या ठिकाणी बांबुपासून तयार करण्यात आलेले आकाशकंदिल, दांडिया, नाईटलॅम्प, खुर्च्या, टेबल, देखाव्याचे साहित्य, चमचा-ताटल्या ठेवण्याची रचना, मध यांसह अन्य काही वस्तु विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरण्यक केंद्र स्थलांतराची फारशी माहिती ग्राहकांना नाही. दुसरीकडे या केंद्राचे स्वरूप पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही. याठिकाणी स्वच्छता गृह तसेच अन्य सुविधा नसल्याने वनविभागाचे कर्मचारीही दुपारी १२ ते चार या वेळेतच या ठिकाणी काम करतात. यानंतर हे केंद्र बंद राहते. एकूणच प्रसिध्दीचा अभाव, वनविभागाचा लालफितीचा कारभाराचा फटका केंद्राला बसल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.