नाशिक – राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासाठी गोंदिया जिल्हा दिल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी तिकडे जाण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. यावर काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले. महायुती सरकारमध्ये भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही खूप अवहेलना सहन करावी लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कांदा प्रश्नी काँग्रेसतर्फे बुधवारी नाशिक येथील नाफेड कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल व शरद आहेर उपस्थित होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नाफेडच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन बाजार समितीत लिलाव पद्धतीने कांदा खरेदीची मागणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थोरात यांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. भुजबळांना बरेच सहन करावे लागत आहे. खरेतर त्यांनी इतके सहन करायला नको. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांची अवहेलना होत असल्याकडे थोरात यांनी लक्ष वेधले.
माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही. भुजबळ हे मंत्री झाल्यानंतर त्यांना त्वरित सरकारी बंगला मिळायला हवा होता. बंगला मुंडे यांच्या ताब्यात असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. महायुतीतील वाद आता खऱ्या अर्थाने बाहेर येत असून खुल्या मैदानात कुस्ती व्हायला पाहिजे, असा टोला त्यांनी हाणला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवटीत सत्ताधाऱ्यांनी लूट केली. या निवडणुकीत चालढकल करण्यामागे सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींचे महत्व कमी करण्याचे मनसुबे आहेत.
लोकांव्यतिरिक्त या संस्थांचे कामकाज चालू शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, आम्ही लढण्यास तयार असल्याचे थोरात यांनी सूचित केले. स्वबळावर लढण्याच्या प्रश्नावर त्यांनी तो अधिकार प्रत्येक पक्षाला असतो, महाविकास आघाडीत तो सर्व पक्षांना असल्याचे थोरात यांनी सांगितले.
पाचव्या रांगेत भ्रमणध्वनी खेळावा लागतो…
महाविकास आघाडीत छगन भुजबळ यांना निमंत्रित केले जाईल का, या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी आम्ही लोकशाही, राज्यघटना वाचविण्यासाठी, न्याय हक्कासाठी लढत असल्याचे सांगितले. जे बरोबर आहेत, त्यांना घेऊन ही लढाई सुरू राहणार आहे. सत्तेसाठी आम्ही लढत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्यातील अनेक जण अपेक्षेने तिकडे गेले. कोणी सत्तेसाठी तर कोणी चौकशी दाबण्यासाठी गेले. त्यांना पाचव्या रांगेत बसावे लागते. मग भ्रमणध्वनी खेळावा लागतो, असा टोला त्यांनी हाणला.