नंदुरबार : विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या माध्यमातून कितीही अपप्रचार केला तरी राज्यातील दोनशेपेक्षा अधिक नगरपालिका महायुती जिंकेल, असा विश्वास भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. नंदुरबार जिल्हा भाजप कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंगळवारी महाजन येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मतदार यांद्यामधील घोळ हा विरोधकांचा कांगावा आणि रडीचा डाव आहे. आपण लोकसभा जिंकलो तर बरोबर आणि हरलो तर चुकीचे, अशी धारणा असलेले विरोधक संधी पाहुन विचार बदलतात. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी निवडणुकीत कसलाही परिणाम जाणवणार नाही. राज्यात आमची महायुती म्हणून लढण्याची भूमिका आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये टोकाचा विरोध असेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा पर्याय असल्याचे महाजन यांनी सांगितले. आम्ही लोकसभेला चारशेपारचा नारा दिला असतानाही मागे राहिलो. आम्ही याद्यांमध्ये घोळ असे म्हटले नाही. सर्व विरोधक आपआपल्या सोईने अर्थ लावत असून कोणी हे सरकार मराठेविरोधी म्हणते, तर कोणी ओबीसी विरोधी म्हणते. विरोधकांना अपप्रचार रेटून न्यायचा असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

या निवडणुका जाहीर होणार होत्याच, तसे सुतोवाच झालेच होते. आम्ही आणि महायुती या निवडणुकांसाठी सज्ज आहोत. मतदार यांद्यामधील घोळ हा विरोधकांचा कांगावा आणि रडीचा डाव आहे. उद्धव ठाकरे,शरद पवार , संजय राऊतं, राहुल गांधी यांनी रचलेला हा डाव आहे. रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा मतदार याद्यामध्ये घोळ होता का, असा प्रश्न करीत मुलगी रोहिणी हरली तर मतदार यांद्यामध्ये घोळ कसा, असे प्रश्न उपस्थित करीत मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसे यांना डिवचले. राज्यात मतदार यांद्यामध्ये कुठेही घोळ नाही. कुठे छपाईत चूक, कुठे दोन वेळा नाव असेल तर ते होत असते. पण याद्यांमध्ये एवढ्या त्रुटी नाही की देशातील चित्र बदलेल आणि फक्त भाजपच निवडून येईल. सरकार ओबीसी विरोधी या नाना पटोले यांच्या आरोपांनाही महाजन यांनी उत्तर दिले. घेत सर्व विरोधक सोईने अर्थ लावत असल्याचे सांगितले. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकामध्ये आम्ही दोनतृतीयांश नगरपरिषदा जिंकू. दोनशेहुन अधिक ठिकाणी जिंकून येण्याचा विश्वास असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांविषयी याआधी विखारी टिका केली. आता दोघांना एकत्र यायचे आहे तर त्यांनी यावे. आम्हाला याबद्दल काही म्हणायचे नाही, असे मंत्री गिरीष महाजन म्हणाले