रेल्वे प्रवासात लंपास झालेला एक लाख रुपयांचा ऐवज आणि महत्त्वाची कागदपत्रे यांचा चोवीस तासांत छडा लावणाऱ्या मनमाड रेल्वे पोलिसांच्या कामगिरीबद्दल कॅनेडियन पर्यटकाने कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय पोलिसांच्या कामगिरीचा अनुभव त्यांनी घेतला.
या वेळी लोहमार्ग पोलीस उपअधीक्षक गौतम पवार, लोहमार्ग निरीक्षक के. एस. जांभळे आदी उपस्थित होते. कॅनडा येथील जॉन पॉल लॅरी कॉस हे गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसने पुणे-मनमाड प्रवास करीत होते. मनमाडला उतरून अजिंठा, वेरूळला जाण्याचे त्याचे नियोजन होते. पण प्रवासाने थकवा आल्याने गाडीत त्यांना झोप लागली. त्याच वेळी त्याच्या बेसावधतेचा फायदा घेत संशयिताने बर्थवरील लॅपटॉप, तीन भ्रमणध्वनी, विदेशी चलन व महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग चोरली. लॅपटॉपमध्ये त्याचा कार्यालयीन मजकूर होता. त्याच गाडीने मनमाडला येऊन लोहमार्ग पोलिसांकडे त्याने फिर्याद दिली. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचे गोळ्या भरलेले पिस्तूल चोरीस गेले ते अद्याप सापडले नाही. यामुळे पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे निघाले असताना परदेशी नागरिकाच्या बॅग चोरीच्या घटनेने त्यात आणखी भर पडली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने संशयितांचा शोध घेणे सुरू केले. अवघ्या २४ तासांत शिर्डी पोलिसांच्या मदतीने सापळा रचत श्रीरामपूर येथील अमजद मेहमूद तांबोळी व त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्याकडून सर्व मुद्देमाल असलेली बॅग हस्तगत करण्यात आली. संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयित तांबोळीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाची नाशिक बाल न्यायालयात रवानगी केली. मुद्देमाल न्यायालयामार्फत जॉन यांच्या ताब्यात मिळणार आहे. सोमवारी मुक्कामी थांबलेल्या जॉन यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक स्थळांची पाहणी करण्यासाठी आपण भारतात आलो. रेल्वे प्रवास करताना बेलापूर स्थानकात लॅपटॉप, भ्रमणध्वनी व विदेशी चलन असलेली प्रवासी बॅग चोरीस गेली. मात्र लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास लावून मुद्देमाल परत मिळवून दिला. पोलिसांच्या कामगिरीचे मनापासून कौतुक असल्याचे जॉन पॉल लॅरी कॉस यांनी नमूद केले.