नाशिक – सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचा बोलबाला झाला आहे. इतका की, जणू आता एआयशिवाय काहीच शक्य नाही. एआयची मोहिनी महाविद्यालयीन विद्यार्थी, अभियांत्रिकी क्षेत्रास सर्वाधिक असली तरी राजकारणी मंडळीही आता त्यात रस घेऊ लागले आहेत. स्वत:ची शिक्षण संस्था असलेले मंत्री छगन भुजबळ हे या क्षेत्रातही आघाडीवर असले तर त्यात नवल ते काय. एआयच्या प्रेमात पडलेले छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही त्यासंदर्भातील धडे देत आपल्यातील शिक्षक जागृत केला.
शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानातून बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असून एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी नाशिकच्या निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले.
आज शिक्षण क्षेत्रात अधिक बदल होत असल्याने पारंपरिक पाटी-पेन्सिलच्या शालेय शिक्षणासह डिजिटल शालेय साधने वापरून मुलांना घडवणे ही काळाची गरज बनली आहे. आता स्मार्ट क्लासरूम म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देण्याची नवीन पद्धती आहे. या क्लासरूममधून विद्यार्थ्यांना चित्रफिती, ॲनिमेशन, प्रोजेक्टर, संगणक यांचा वापर करून कठीण विषय व संकल्पना सोप्या आणि रोचक पद्धतीने शिकविल्या जाणार आहेत. यामुळे मुलांची अभ्यासातील आवड वाढून त्यांची सर्जनशीलता खुलून येईल. जगभर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. रोबोटिक्स, हेल्थकेअर, शेती, उद्योग, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. डोंगरगावातील विद्यार्थ्यांना देखील अशा जागतिक पातळीवरील ज्ञानाची ओळख मॉडेल शाळेतून होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
एआय डिजिटल लॅबमुळे मुलांना डेटा, विचारप्रक्रिया, यंत्रमानव यांची प्राथमिक माहिती मिळेल. भविष्यकाळात ते कुठल्याही क्षेत्रात गेले तरी या शिक्षणाचा त्यांना मोठा उपयोग होईल. आजचे युग हे कोडींगचे युग आहे. मोबाईल ॲप, संगणक सॉफ्टवेअर, वेबसाईट्स या सर्व गोष्टी कोडींगशिवाय शक्य नाहीत. आता मुले आपल्या शाळेतूनच कोडींग शिकतील. यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेत, समस्या सोडविण्याच्या पद्धतीत, गणित व तर्कशक्तीत प्रचंड सुधारणा होईल.
गावातील शाळेतील मुले भविष्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये काम करतील यात शंका नाही. रोबोटिक्स लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञानाचे नवे धडे व तंत्रज्ञान शिकतील. हे ज्ञान भविष्यात त्यांना संशोधक, अभियंता, शास्त्रज्ञ बनविण्यास मदत होणार आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. परंतु या शिक्षणाच्या कार्यात गावकऱ्यांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगत ग्रामीण भागातील शाळांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, मुलांच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या निधीसाठी शासन कटिबद्ध आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, चिनी, जपानी, जर्मन अशा विविध आंतरराष्ट्रीय भाषांतून व सांकेतिक भाषेतून संवाद सादरीकरण केले.