नाशिक – महायुती दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांना मिटविता आलेला नाही. कोणा एकाची नियुक्ती केल्यास दोन पक्ष नाराज होतील, या भीतीने दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नियुक्त न करण्याचेच धोरण सध्यातरी महायुतीच्या नेत्यांनी आखलेले दिसते. नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी वरिष्ठ स्तरावर कोणत्याच हालचाली होत नसल्याने या पदासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर पालकमंत्री नसल्याने कोणाचे काहीही अडत नाही, असेच सर्वांना सुनावले आहे.
जानेवारीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती. परंतु, नियुक्ती जाहीर होताच महायुतीत स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाल्याने अवघ्या चोवीस तासात दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली होती. पालकमंत्रीपदावरुन महायुतीतील राजकीय रस्सीखेच संपलेली नसून उलट तिला अधिक जोर आला आहे. शिंदे गट नाशिक जिल्ह्यात केवळ दोनच आमदार असतानाही दादा भुसे यांच्या नावासाठी आग्रही आहे.
शिंदे गटाचे दुसरे आमदार सुहास कांदे यांचा छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध आहे. अजित पवार गटाचा पालकमंत्रीपदावर हक्क असल्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ सांगत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांना स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजवंदनाची संधी दिल्यानंतर नाराज झालेले छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजवंदनास जाण्यास नकार दिला. प्रारंभी त्यांनी तब्येतीचे कारण पुढे केले होते. नंतर जे करायचे ते नाशिकमध्येच, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती.
नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सात आमदार असल्याने पालकमंत्रीपदावर हक्क सांगण्याची आवश्यकता असल्याचे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्याकडेच पालकमंत्रीपद असावे, यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव येथे कुणाला मंत्री करायचे आणि कुणाला पालकमंत्री करायचे, हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असून त्यासाठी ते सक्षम आहेत, अशी भूमिका मांडली होती. पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे किंवा नाही, याकडेही ते लक्ष देतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतून अजित पवार गटाने अंग काढून घेतले की काय, असा संभ्रम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नाशिक येथे कुंभमेळा आढावा बैठक घेत छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदाची स्पर्धा आपण अजून सोडलेली नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्याची नियुक्ती झालेली नसल्याने कोणाचे काहीही अडून बसलेले नाही. जिल्ह्यात चार मंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन धरल्यास पाच मंत्री आहेत. त्या्मुळे नागरिक कोणालाही भेटू शकतात, अशी मल्लिनाथी भुजबळ यांनी केली आहे.