नाशिक – शहरातील उड्डाण पुलाखालील द्वारका आणि मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त करताच रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेची अवघी यंत्रणा कामाला लागली. सकाळपासून या भागातील अतिक्रमणांवर धडक कारवाईला सुरूवात केली. रस्त्यालगत उभी वाहने वाहतूक पोलिसांनी उचलून नेत वाहतुकीतील अडथळे दूर केले. फेरीवाले आणि हातगाडीधारकांवर कारवाईचे सुतोवाच करण्यात आले.

सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या मुंबई नाका आणि द्वारका चौक परिसरास शनिवारी भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी या भागातील फेरीवाले, उड्डाण पुलाखाली अनधिकृत बस्तान मांडणारे विक्रेते, स्वच्छतेचा अभाव, अनधिकृतपणे थांबलेल्या रिक्षांवर कारवाईकडे दुर्लक्ष यावरून रोष प्रगट केला होता. या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका त्यांनी मांडली. प्रमुख अधिकाऱ्यांना हे विषय जिव्हाळ्याचे वाटत नसल्याचे त्यांनी सुनावले. या घटनाक्रमानंतर मनपा, जिल्हाधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने द्वारका चौकातून मुंबई नाका आणि ओझरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. दुकानाच्या पुढील शेड, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या-हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. दोन्ही बाजुच्या सेवा रस्त्यांवर पुढील आठ दिवस कायमस्वरुपी ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली. उड्डाण पुलाखाली वास्तव्य करणाऱ्या विक्रेते व कुटुंबियांचे पंचवटीतील निवारागृहात स्थलांतर करण्यात येणार असल्याचे झगडे यांनी नमूद केले. कारवाईला सुरूवात झाल्यानंतर काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅरेजधारक सेवा रस्त्यावरील जागेचा वापर दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांच्या तळासाठी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळे येत असल्याने वाहतूक पोलिसांनी या परिसरातील अशी वाहने उचलून नेली. सायंकाळी खासगी प्रवासी बसेसवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.