नाशिक – महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जिल्ह्यात नाशिक मध्य, नाशिक पूर्व, इगतपुरी, चांदवड आणि मालेगाव मध्य या पाच जागांवर काँग्रेस ठाम असल्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. महत्वाची बाब म्हणजे, नाशिक मध्य या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघावर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आधीच दावा सांगितला आहे. उभय पक्षांत जागेवरून चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे.

आदिवासी बांधवांच्या निर्धार मेळाव्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या पटोले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. मावळत्या विधानसभेत इगतपुरीतील काँग्रेसचा एकमेव आमदार हिरामण खोसकर अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्यामुळे पक्षासह महाविकास आघाडीची पाटी कोरी झाली. जिल्ह्यात १५ पैकी एकही जागा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नाही. अशा स्थितीत अधिकाधिक जागा लढविण्यासाठी तिन्ही पक्षात स्पर्धा लागली आहे. महाविकास आघाडीकडे जिल्ह्यात एकही जागा नसल्याने मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील मते कोणाला मिळाली, सक्षम उमेदवार कोण, अशा निकषांवर जागा वाटपाची प्रक्रिया पुढे सरकत आहे. महाविकास आघाडीचे २८८ पैकी जवळपास २२६ जागांवरील वाटप अंतिम झाल्याचा दावा पटोले यांनी केला होता. उर्वरित जागांचा प्रश्न लवकरच तिन्ही पक्षांचे नेते वाटाघाटीने सोडवतील. कोणत्याही जागेवरून आमच्यात वाद नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तथापि, स्थानिक पातळीवरील विचार करता काही मतदारसंघ मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांत चढाओढ सुरू आहे.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इगतपुरी, चांदवड, मालेगाव मध्य, नाशिक मध्य, नाशिक पूर्व या पाच जागा काँग्रेसला मिळाव्यात, यावर पक्ष ठाम असल्याचे स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक मध्यमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. तुलनेत नाशिक पूर्वमध्ये ती बरीच कमी म्हणजे चार आहे. चांदवड विधानसभेसाठी चार तर, मालेगाव मध्य मतदारसंघासाठी दोन अर्ज प्राप्त झाले आहेत. या मतदारसंघात अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पदाधिकारी सांगतात. हिरामण खोसकर यांच्या पक्षांतरामुळे इगतपुरीत नवीन चेहरा शोधावा लागणार आहे. या मतदारसंघात १७ जणांनी अर्ज भरले असून अन्य तिघांनी संपर्क साधला आहे.

हेही वाचा – ही तर जनतेची दिशाभूल, रमेश चेन्नीथला यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक मध्यवरून संघर्ष

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते. गतवेळी पक्षाच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील दुसऱ्या क्रमांकावर होत्या. या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या जागेवर दावा सांगितला जात आहे. या जागेसाठी काँग्रेसमध्ये १५ जण इच्छुक आहेत. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील. राहुल दिवे, शाहू खैरे, हनिफ बशीर. नितीन ठाकरे आदींचा समावेश आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने शहरात एक जागा लढवावी, अशी सूचना शरद पवार यांनी आधीच केली होती. महानगरपालिका निवडणुकीत त्याचा लाभ होईल, असे गृहितक त्यांनी मांडले होते. शिवसेना ठाकरे गट नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन जागांसाठी आग्रही आहे. तडजोडीत कोणता पक्ष कोणती जागा सोडणार, याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष आहे.